अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशी चौफेर प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे मनवा नाईक. तिने आतापर्यंत अनेक आघाडीच्या चित्रपटात काम केले आहे. फक्त अभिनेत्री म्हणून नव्हे तर एक यशस्वी निर्माती म्हणूनही तिला ओळखले जाते.
याशिवाय मनवा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. समाजातील विविध विषयावार ती मत मांडताना दिसतात. नुकतेच तिने प्रगतीच्या नावाखाली महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराचा कसा ह्रास होत चालला आहे, यावर परखड मत मांडलं.
मनवाने इन्स्टाग्रामवर एका कन्स्ट्रक्शन साईटचा फोटो शेअर केला. तिने कॅप्शनमध्ये लिहलं, ‘हे पूर्णपणे निराशाजनक आहे. पण, वायू प्रदूषण, रस्ते, बांधकाम साइट्स, ट्रॅफिक आणि सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने मुंबई हे आता सर्वात वाईट शहर बनलं आहे.
धुळीचे थर, इमारतींचे रचले जाणारे हे कुरूप ब्लॉक्स, तर नवीन पायाभूत सुविधांच्या नावाखाली वर्षानुवर्षापासून खोदकाम केले जात आहे. गौरवशाली बँडस्टँड, हाजी अली ही ठिकाणे आता पूर्वीसारखे राहिले नाहीत. रेस कोर्सही यात आहे. हे सगळं पाहून मन दुखावलं जात आहे’. या सोबतच तिने या पोस्टचा राजकारणाशी संबंध नाही, असेही म्हटलं.