अपघातापासून आत्महत्येपर्यंत अनेक कारणांनी मृत्यू झाल्यानंतर कायदेशीर सोपस्कारांसाठी मृतदेहाचे विच्छेदन अनिवार्य असते. ज्यांची दोन वेळची खायची भ्रांत आहे, अशा कुटुंबीयांसाठी शवविच्छेदनाची भ्रष्ट व्यवस्था पाहिल्यावर मृत्यू स्वस्त आणि शवविच्छेदन महाग असल्याची भावना होत आहे.
भ्रष्ट व्यवस्था आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे जिल्ह्यात मृत्यूनंतरची परवड नातेवाइकांचा अंत पाहणारी ठरत आहे.
अपवाद वगळता जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी दोन ते पाच हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे ”मरणानंतरही सरेना भ्रष्ट व्यवस्थेचा प्रवास; जिल्ह्यात पोस्टमार्टमलाही येतो लाचखोरीचा वास” असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या भ्रष्ट व्यवस्थेचेच पोस्टमार्टम करण्याची मागणी होत आहे.
सांगली जिल्ह्यात दोन्ही जिल्हा रुग्णालयांसह ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालये मिळून १५ ठिकाणी शवविच्छेदन केले जाते. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत मृत्यू होतो, त्याच हद्दीतील रुग्णालयात शवविच्छेदन होते. मात्र, भ्रष्ट व्यवस्थेमुळे मरणानंतर सरणापर्यंतचा प्रवासही भ्रष्टाचारानेच बरबटलेला असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. जिथे खासगी व्यक्ती शवविच्छेदन करते, तिथे दोन ते पाच हजार रुपये घेतले जातात. पैशांचा दर ठरल्याशिवाय शवविच्छेदन होत नाही. जिथे शासकीय सेवेतील कर्मचारी शवविच्छेदन करतात, तेथेदेखील चिरीमिरी दिल्याशिवाय शवविच्छेदन केले जात नाही. अशा ठिकाणी पाचशे ते दोन हजार रुपये घेतले जात असल्याची चर्चा आहे. चिरीमिरी नसेल तर नातेवाइकांना शवविच्छेदनासाठी ताटकळत बसावे लागते.
पोस्टमार्टमच्या व्यवस्थेने मृत्यूही ओशाळला
काही दिवसांपूर्वी तासगाव येथील सामान्य कुटुंबातील एका तरुणाने आत्महत्या केली. वृद्ध आई-वडील, इतर कोणाचाही आधार नाही. अशा तरुणाची आत्महत्या झाल्यानंतर त्याचे शवविच्छेदन तासगाव ग्रामीण रुग्णालयात केले. मात्र, शवविच्छेदन करणाऱ्या खासगी व्यक्तीने नातेवाइकांकडून दोन हजार रुपये घेतले. आणखी एका घटनेत उदरनिर्वाहासाठी उत्तरांचलमधून मजुरीसाठी आलेल्या एका कामगाराने आत्महत्या केली. त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी आष्टा येथील रुग्णालयातील कर्मचारी आला. त्याने नातेवाइकांकडून शवविच्छेदनासाठी साडेतीन हजार रुपये घेतले. जिवंतपणी आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केलेल्या तरुणाच्या नातेवाइकांकडून शवविच्छेदनासाठी घेतलेल्या लाचेने मृत्यूही ओशाळला जावा असे चित्र आहे.
पोस्टमार्टम होणारी जिल्ह्यातील ठिकाणे
जिल्हा रुग्णालये – सांगली, मिरज
जिल्हा उपरुग्णालये – शिराळा, कवठेमहांकाळ, इस्लामपूर
ग्रामीण रुग्णालये – कोकरूड, वांगी, जत, करंजे, पलूस, तासगाव, कडेगाव, आटपाडी, विटा, आष्टा.
निम्म्या ठिकाणी खासगी नियुक्त्या
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १३ पैकी सात ठिकाणी शवविच्छेदनासाठी खासगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आटपाडी, आष्टा, जत, पलूस, तासगाव या ग्रामीण रुग्णालयांत आणि इस्लामपूर, कवठेमहांकाळ या जिल्हा उपरुग्णालयांत शवविच्छेदनाची भिस्त खासगी व्यक्तीवर असून, या ठिकाणी दोन ते पाच हजार रुपये मोजावे लागतात.