हप्तेखोर गुंडांविरोधात कोल्हापूर पोलिस उतरले रस्त्यावर; राजेंद्रनगर, शाहूपुरीत कोम्बिंग ऑपरेशन

0
75

कोल्हापूर : व्यावसायिकांकडून खंडणी आणि हप्ते उकळणाऱ्या गुंडांच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार बुधवारपासून जिल्ह्यात गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस रस्त्यावर उतरले.

शाहूपुरी आणि राजेंद्रनगर परिसरात कोम्बिंग ऑपरेशनद्वारे संशयितांची धरपकड केली. तसेच, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी शिरोली आणि गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथे उद्योजकांसोबत बैठका घेऊन गुंडांच्या विरोधात तक्रारी देण्याचे आवाहन केले.

गुंडांच्या मारहाणीत उद्यमनगर येथील स्वीटमार्ट मालकाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी व्यावसायिकांना त्रास देणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत. मंगळवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीतही या मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. तातडीने रस्त्यावर उतरून गुंडांच्या विरोधात कारवाया करण्याचे आदेश अधीक्षक पंडित यांनी दिले होते.

त्यानुसार बुधवारी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी राजेंद्रनगर येथे कोम्बिंग ऑपरेशन करून सराईत गुंडांचा शोध घेतला. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून गुंडांच्या विरोधात तक्रारी देण्याचे आवाहन देसाई यांनी केले.

शाहूपुरी पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शाहूपुरी, कनाननगर येथे कोम्बिंग ऑपरेशन करून संशयितांची झाडझडती घेतली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

या कारवाईत काही संशयितांना ताब्यात घेतले असून, चाकू, तलवार, कोयते अशी शस्त्रेही पोलिसांनी जप्त केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे, शाहूपुरीचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा, शीघ्र कृती दलाने कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला.

एक फोन करा; पोलिस पोहोचतील

अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी बुधवारी गोकुळ शिरगाव आणि शिरोली एमआयडीसी येथे उद्योजकांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. खंडणी किंवा हप्ते मागण्यासाठी येणाऱ्या गुंडांच्या विरोधात तक्रारी देण्यासाठी डायल ११२ क्रमांकाचा वापर करा.

तक्रारी दिल्यास तातडीने गुंडांचा बंदोबस्त केला जाईल, अशी ग्वाही देसाई यांनी उद्योजकांना दिली. तसेच, एमआयडीसी परिसरात जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन त्यांनी केले. दोन्ही बैठकांसाठी गोशिमा आणि स्मॅक या दोन्ही संघटनांचे पदाधिकारी व उद्योजक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here