कोल्हापूर : ग्लोबल टेलिकॉम लिमिटेड कंपनीच्या बंद मोबाइल टॉवरवर चोरट्यांची नजर पडली असून, गेल्या दोन वर्षात कंपनीचे २१ टॉवर गायब झाले आहेत. देवकर पाणंद आणि मंगळवार पेठेतील टॉवरची चोरी झाल्याची फिर्याद कंपनीचे अधिकारी प्रवीण तुकाराम टिकारे (वय ४०, रा.
सुर्वेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर) यांनी बुधवारी (दि. १०) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. वर्षभरात एकाच कंपनीचे २१ टॉवर गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
फिर्यादी प्रवीण टिकारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीटीएल कंपनीचे जिल्ह्यात एकूण ६५ मोबाइल टॉवर होते. कोरोना काळात यातील काही टॉवर बंद पडले. लॉकडाऊन काळात कंपनीची काही कार्यालये बंद झाल्याने टॉवरच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाले. याचाच गैरफायदा उठवत चोरट्यांनी जिल्ह्यातील २१ टॉवर उतरवून सुमारे दोन कोटी रुपयांचे साहित्य लंपास केले.
गेल्या दोन वर्षांपासून चोरीचे प्रकार सुरू आहेत. देवकर पाणंद आणि मंगळवार पेठेतील दोन टॉवर चोरीस गेल्याचा प्रकार लक्षात येताच कंपनीच्या अधिका-यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. या दोन्ही टॉवरचे सुमारे २० लाखांचे साहित्य चोरट्यांनी पळवले आहे. यात मेटल स्ट्रक्चर आणि इलेक्ट्रीक साहित्याचा समावेश आहे. उंच टॉवरचे अवजड साहित्य उतरवून ते चोरणे सोपे काम नाही. त्यामुळे या चोरीबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.