कोल्हापूर : महायुतीला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पातळीवर ‘इंडिया’ आघाडी मजबूत होत असल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकाराने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या आघाडीची बैठक बुधवारी सकाळी एका हॉटेलवर झाली.
लोकसभेला उमेदवार कोणत्याही पक्षाचा व कोणही असो त्याच्या विजयासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
कॉंग्रेसच्या खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये महायुतीविरोधातील सर्व पक्ष एकत्र आले होते. त्यानंतर अशा पद्धतीने एकत्र येण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
त्यामुळेच सतेज पाटील यांनी ठाकरे आल्याची संधी घेत ही बैठक आयोजित केली. यावेळी भाकपचे नेते दिलीप पोवार यांच्या हस्ते ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले आणि याच पद्धतीने सध्याच्या केंद्र आणि राज्य सरकारविरोधात लढा देण्यासाठी वज्रमूठ आवळण्याचे आवाहन केले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी आपण पक्षाकडे उमेदवारी मागितल्याचे सांगितले. यावेळी ठाकरे यांनी उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. प्रत्येक पक्षाला उमेदवारी मिळणारच नाही; परंतु, तरीही महाविकास आघाडी म्हणून दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याची इतरांनी भूमिका घेतली पाहिजे, असे स्पष्ट केले.
यावेळी खासदार अनिल देसाई, आमदार जयश्री जाधव, जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, संजय पवार, विजय देवणे, रवी इंगवले, सुनील माेदी, माजी आमदार सत्यजित पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के. पाेवार, ॲड. महादेवराव आडगुळे, अनिल घाटगे, माकपचे राज्य सचिव उदय नारकर, अतुल दिघे, भाकपचे जिल्हा सरचिटणीस सतीशचंद्र कांबळे, प्रा. सुभाष जाधव, सुभाष देसाई, समाजवादी पक्षाचे शिवाजीराव परूळेकर, शेकापचे बाबूराव कदम, बाबासाहेब देवकर, आपचे जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील, वंचित आघाडीचे पदाधिकारी यांच्यासह पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
जनमत संघटित करण्याचे आव्हान
सध्याचे सरकार सुडाचे राजकारण करत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाविरोधात जनमतामध्ये संताप आहे. हेच जनमत संघटित करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. हे अजिबात अशक्य नाही. त्यामुळे सर्वांनी एकमुखाने ‘इंडिया’ मजबुतीसाठी कामाला लागा, असे आवाहन यावेळी प्रमुख नेत्यांनी केले.