अंबड व घनसावंगी तालुक्यात साखर कारखानदारीचे क्षेत्र जास्त असतानाही या भागात गुळाची गोडी कायम असून, सद्यस्थितीत गुळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. गूळ उद्योगाला पसंती दिल्यामुळे अनेकांच्या हाताला रोजगारही मिळाल्याचे दिसून येत आहे.
अंबड तालुक्यातील बळेगाव ते कोठाळा व घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी, तीर्थपुरी, मंगरूळ, कोठी हा भाग गोदावरी नदीच्या काठावर असल्याने येथे ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच या भागात बोअर, विहिरीबरोबर कालव्याला ही पाणी मिळत आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्रात दरवर्षी वाढत आहे.
या भागातील ऊस नेण्यासाठी साखर कारखान्यांची चढाओढ असते. परंतु, यावर्षी शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांपेक्षा गूळ कारखान्याला पसंती दर्शविल्याने त्यांना ऊस दिला जात आहे. गूळ उत्पादक शेतकऱ्यांना सुधारित उसासाठी प्रतिटन ३३०० रुपये भाव देत असल्याने शेतकऱ्यांचा कल गूळ उत्पादक कारखानदारांकडे वाढताना दिसत आहे यामुळे परिसरत अनेक ठिकाणी गुन्हाळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
कारखाने देऊ लागले नगदी पैसे
शेतकऱ्यांनी गूळ कारखान्यावर ऊस दिल्यास नगदी पैसे दिले जात आहेत. त्यामुळे शेतकरी गुळाकडे वळला आहे, साखर कारखान्यावर मात्र भावातील तफावत आढळून येते. तसेच ‘एफआरपीबाबत संभ्रम, बिल वेळेवर मिळत नाही, इत्यादी कारणांमुळे या भागातील शेतकऱ्यांनी यंदा गूळ उत्पादकांना ऊस देण्यास सुरुवात केली आहे. गूळ कारखान्यावर प्रतिटन उसामधून हिवाळा असेल तर सरासरी १ क्चिटल गूळ, उन्हाळ्यात प्रतिटन उसामधून १.४० क्चिटल गूळ निर्मिती होत आहे.-भागवत स्वराद, गूळ व्यवस्थापक
गुळाचा भाव ३४०० रुपये
सध्या गुळाचा ठोक भाव बाजारपेठेत ३३०० ते ३४०० आहे. या भागातील निर्मिती झालेला गुळास छत्रपती संभाजीनगर व जालन्याची बाजारपेठ चांगली मागणी असल्यामुळे चांगला दर मिळतो. गूळ उद्योग सरासरी चार ते पाच महिने सुरु असतो. दररोज ६० ते ८० टन ऊस गाळप होत असून यातून ६ ते ८ टन गूळ निर्मिती केली जात आहे. जालना जिल्ह्यात गुळ उद्योगासाठी स्थानिक स्तरावर कुशल मजूर उपलब्ध होत नाही. यामुळे गूळ निर्मिती बद्दलची सखोल माहिती असलेले काही मजूर हे उत्तर प्रदेश येथून आणावे लागतात. – डॉ. संभाजी चोथे, व्हीएससी गूळ उत्पादक, शहागड.