‘ए. एस. ट्रेडर्स’मधील गुंतवणुकीचे पैसे परत देता न आल्यानेच दोनवडेतील खून, तपासात निष्पन्न

0
152

कोपार्डे : ‘ए. एस. ट्रेडर्स’मध्ये गुंतवलेले पैसे परत करता येत नसल्याने दोनवडे येथील लॉज मालक चंद्रकांत पाटील यांचा शनिवारी सचिन जाधव व दत्तात्रय पाटील यांनी गोळ्या झाडून खून केल्याचे समोर आले आहे.

रविवारी दुपारी एक वाजता चंद्रकांत यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान, संशयित आरोपी दत्तात्रय कृष्णात पाटील (वय ३८) व सचिन शामराव जाधव ४० दोघे रा खुपिरे ता करवीर यांना अटक केली. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. संशयित आरोपींनी पिस्तूल कोठून आणली, कोणी पुरवली यासंबंधीचा तपास पोलिस करीत आहेत.

चंद्रकांत आबाजी पाटील यांनी सचिन जाधव व दत्तात्रय पाटील यांच्या माध्यमातून पाच ते सहा लाख रुपये ए. एस. ट्रेडर्समध्ये गुंतवले. ते परत मिळवण्यासाठी दत्तात्रय पाटील व सचिन जाधव यांच्याकडे चंद्रकांत यांनी तगादा लावला; पण आर्थिक अडचणीत आलेल्या या दोघा संशयित आरोपींनी पैसे परत करता येत नसल्याने शनिवारी जाधव, पाटील एकत्र आले. आपल्याकडून पैसे परत देणे होणार नाही. या प्रकारातून आपली सुटका नाही, हे ओळखून चंद्रकांतला संपवण्याचा प्लॅन केला.

सचिनने गुजरातमधून गावठी पिस्तूल आणले होते. चंद्रकांत यांना मारण्यासाठी हे दोघे कोल्हापूर गगनबावडा मार्गावर लॉजवर आले. यावेळी चंद्रकांतबरोबर पैसे परत देण्यावरून सचिन व दत्तात्रय यांच्याबरोबर बाचाबाची झाली. यातून झटापट सुरू झाली. त्यावेळी संशयितांनी गावठी पिस्तुलाने चंद्रकांतवर गोळी झाडली. तेथून ते दोघेही थेट करवीर पोलिस ठाण्यात हजर झाले.

आरोपी आर्थिक संकटात

संशयित आरोपी दत्तात्रय पाटील व सचिन जाधव यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. सचिन जाधव याने बंगला बांधला असला तरी अलीकडे स्वतःची दोन एकर जमीन त्याने विकली आहे. सचिन व दत्तात्रय ट्रॅक्टरवर ऊसतोड करतोय. दत्तात्रय पाटील अविवाहित असून, कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आई, एक भाऊ यांच्यासह तो राहतो. खुपिरे येथे अल्प शेती असून, मिळेल ते काम करून तो घर चालवतो. आज घराला कुलूप लावून आई व लहान भाऊ परागंदा झाले आहेत.

आरोपीच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त

शनिवारी दोनवडेच्या चंद्रकांत पाटील यांच्यावर गोळीबार करून ठार मारणारे संशयित मारेकरी खुपिरे येथील आहेत. संशयित दत्तात्रय पाटील व सचिन जाधव यांच्या घरासमोर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सचिनकडे लक्झरी कार

सचिनने एक वर्षापूर्वी ‘ए. एस.’चे काम काम बंद करून स्वतःची शेअर मार्केट कंपनी स्थापन केली असल्याचे समजते. यातून अनेकांचे लाखो रुपये गुंतवणूक केली आहे. गुंतवणूकदारांनी सचिनकडे पैशाचा तगादा लागला आहे. राहते घर वगळता त्याने एक महिन्यापूर्वी सर्व शेती विकली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here