एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत पास करण्यासाठी त्याच्या जागी डमी उमेदवार बसवण्याचे अनेक प्रकार याआधी घडले आहेत. मात्र आपली प्रेयसी परीक्षेत पास व्हावी, म्हणून तिच्या वेशात एक तरुण परीक्षा केंद्रावर गेल्याचा प्रकार पंजाबमध्ये घडला आहे.
मात्र आपल्या प्रेयसीचं रूप धारण करून परीक्षा देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बनाव उघड झाला आहे.
कोटकपुरा येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये ७ जानेवारी रोजी एक परीक्षा होती. यावेळी फाजिल्का येथील रहिवासी असणाऱ्या अंग्रेज सिंह याने प्रेयसी परमजीत कौर हिचा वेश धारण करून परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
हातात लाल बांगड्या, ओठांवर लिपस्टिक आणि महिलांच्या कपड्यात हा तरुण परीक्षा केंद्रावर पोहोचला होता. मात्र या प्रकाराची माहिती शाळेतील शिक्षकांना मिळाली आणि त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंग्रेज सिंह या तरुणाने त्याच्या प्रेयसीच्या जागी परीक्षा देण्यासाठी बनावट मतदान कार्ड आणि आधारकार्डही तयार केलं होतं. मात्र बायोमेट्रिक डिव्हाइसमुळे त्याच्या या बनावाचा भंडाफोड झाला. त्याच्या बोटांचे ठसे बायोमेट्रिक डिव्हाइसमध्ये जुळून न आल्याने तो परीक्षा देऊ शकला नाही.
दरम्यान, याप्रकरणी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.