गांधीनगर (ता. करवीर) येथे ६ वर्षांच्या मुलीवर १३ वर्षांच्या मुलाने चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर संशयित मुलाला जमावाने पोलिसांच्या ताब्यात दिले.
संशयित मुलावर बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ही बातमी गांधीनगरात पसरताच पोलिस ठाण्यासमोर नागरिकांचा मोठा जमाव जमला होता.
याबाबतची माहिती अशी, शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घराशेजारी खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीला अल्पवयीन मुलाने चॉकलेटचे आमिष दाखवून जवळच असलेल्या घराच्या गच्चीवर नेले. त्या ठिकाणी तो मुलगा तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करीत होता. यावेळी त्या मुलीची आई मुलीला शोधू लागली. घराजवळील सीसीटीव्हीचे फूटेज तपासले असता मुलीला तो मुलगा जिन्यावरून नेत असल्याचे दिसले.
मुलीची आई आणि शेजारी गच्चीवर गेले असता त्या ठिकाणी मुलगी आणि मुलगा दिसून आले. मुलगा नग्न अवस्थेत होता. यावेळी मुलीच्या आईने आरडाओरडा केल्यावर परिसरातील नागरिक जमले. त्यांनी मुलाला मारहाण करीत पोलिस स्टेशनला आणले. तोपर्यंत ही बातमी गांधीनगरात पसरली.
ही बातमी समजताच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून पोलिस स्टेशनकडे धाव घेतली. बघता बघता पोलिस स्टेशनसमोर शेकडो लोकांचा जमाव जमला. सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांनी जमावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, संशयित आरोपींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आणि लोकप्रतिनिधी, वरिष्ठ पोलिस अधिकारी येत नाहीत तोपर्यंत हलणार नाही, अशी भूमिका जमावाने घेतली.
जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी पोलिस स्टेशनला भेट दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांचे जलद कृती दल पाचारण केले. यानंतर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि पंकज गिरी, गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सपोनि दिगंबर गायकवाड, कागल पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक करपे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळंमकर आदींसह फौजफाटा दाखल झाला.
दरम्यान, आमदार ऋतुराज पाटील, भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांनी पीडित मुलीच्या पालकांना भेटून धीर दिला. यानंतर सिंधी सेंट्रल पंचायतमध्ये झालेल्या शांतता बैठकीत आमदार ऋतुराज पाटील, शौमिका महाडिक यांनी जमावाला शांततेचे आवाहन करून पोलिसांना दोषींवर कडक कारवाईच्या सूचना दिल्या. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील करीत आहेत.