थंडीच्या दिवसात लहान बाळांची अधिक काळजी घेणे महत्वाचे ठरते. बदलत्या मोसमामुळे नवजात बाळाला सर्दी, खोकला, ताप अशा आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. बऱ्याचदा सर्दीमुळे लहान बाळांचे नाक चोंदते आणि त्यामुळे लहान मुलं नीट श्वास घेऊ शकत नाहीत.
तेव्हा सर्दीमुळे जर लहान बाळाचं नाक चोंदलं असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा तसेच यावर काही घरगुती उपाय देखील प्रभावी ठरू शकतात.
तेल मालिश : लहान बाळाचं नाक सर्दीमुळे चोंदलं असेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाने बाळाची मॉलिश करू शकता. साधारण कोमट तेल तुम्ही बाळाच्या नाकात, टाळूवर आणि पाठीवर लावू शकता. ज्यामुळे बाळाला सर्दी आणि शिंकांपासून आराम मिळेल आणि त्याच चोंदलेले नाक मोकळं होईल.
गरम पाण्याने आंघोळ घाला : जर तुमच्या बाळाचं नाक चोंदलं असेल तर तुम्ही गरम पाण्याने त्याला आंघोळ घाला. तसेच पाणी हे खूप जास्त गरम नसावे याची काळजी घ्या. लहान बाळाला गरम पाण्याने आंघोळ घातल्याने त्याला उब मिळते ज्यामुळे त्याचे नाक मोकळे होईल.
गरम वाफ द्या : सर्दीमुळे जर तुमच्या बाळाचे नाक चोंदले असेल तर तुम्ही त्याला गरम पाण्याची वाफ देखील देऊ शकता. तुम्ही लहान बाळाला थेट गरम वाफ न देता त्याला स्टीम वाल्या खोलीत बसवा. तुम्ही यासाठी ह्यूमिडीफायरचाही वापर करू शकता, यामुळे बाळाचे चोंदलेले नाक मोकळे होते.
स्तनपान : बाळाचे नाक सर्दीमुळे चोंदले असेल तर त्याला स्तनपान करा. आईच्या दुधात अँटीबॉडीज असतात जे बाळाची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करतात. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर बाळाचा सर्दी, खोकला सारख्या आजारांपासून बचाव होतो आणि आराम मिळतो.
नेजल स्प्रे : जर बाळाचं नाक बंद झालं असेल तर ते मोकळं करण्यासाठी तुम्ही नेजल स्प्रे वापरू शकता. यासाठी तुम्ही एक कप गरम पाण्यात एक चमचा मीठ घाला आणि पाणी थंड झाल्यावर ड्रॉपच्या मदतीने 2 ते 4 ड्रॉप बाळाच्या नाकात टाका. यामुळे चोंदलेल नाक मोकळं होण्यास मदत होते.
(सदर माहिती ही इंटरनेटवरून मिळालेल्या मजकुरावर आधारित आहे. त्यामुळे लहान बाळांवर घरगुती उपायांचा अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)