सोलापुरात शरद पवार गटात खळबळ, राष्ट्रवादीच्या खास माणसावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

0
51

सोलापूर, 25 जानेवारी: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे सोलापूर जिल्ह्यातील कट्टर समर्थक अभिजीत पाटील यांच्यावर राज्य सहकारी बँकेने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अभिजीत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

अभिजीत पाटील हे शरद पवार गटाचे कट्टर समर्थक असून ते पंढरपूर जवळच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. कारखान्याकडे राज्य सहकारी बँकेची जवळपास साडेचारशे कोटीहून अधिक थकीत रक्कम आहे.

ही थकीत रक्कम कारखान्याने बँकेकडे भरली नसल्याने राज्य सहकारी बँकेने पंढरपूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार रात्री उशिरा विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासह 20 संचालकांवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये बँकेची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजीत पाटील हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून ओळखले जातात. जून 2022 मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अभिजीत पाटील यांचे पॅनल निवडून आले आहे. पूर्वीच्या संचालक मंडळाने राज्य सहकारी बँकेकडून वेळोवेळी कर्ज घेतलं आहे. त्याची आजच्या घडीला जवळपास साडेचारशे कोटीहूनअधिकची रक्कम थकीत आहे. त्यामुळे राज्य सहकारी बँकेने थकीत रक्कम वसूल करण्यासाठी संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here