कोल्हापूर-जयसिंगपूरदरम्यान घेतली हायस्पीड रन चाचणी

0
64

कोल्हापूर : कोल्हापूर ते जयसिंगपूर दरम्यान हायस्पीड रेल्वे धावणार असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी बुधवारी सांगितले. कोल्हापूर ते जयसिंगपूर दरम्यान हायस्पीड ट्रेन टेस्टिंग ट्रॅक बांधून त्यावर तासाला सर्वाधिक वेग असलेल्या गाड्यांची चाचणी घेण्यात येणार आहे.

रेल्वेकडून सामान्य गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी चाचपणी केली.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यादव यांनी बुधवारी कोल्हापूर रेल्वे स्थानकाची वार्षिक पाहणी केली. त्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा मार्गावरील रेल्वेमार्गाचीही पाहणी केली. यादव म्हणाले, गतीशक्ती योजनेतील कोकण रेल्वेला कोल्हापुरातून जोडणाऱ्या वैभववाडी मार्गाचे सर्वेक्षण सुरू आहे, या मार्गाचा आराखडा तयार आहे, या प्रक्रियेला वेळ लागेल पण यासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता नाही, रेल्वे बोर्डाची मान्यता मिळताच याचे काम सुरू होईल. अमृत भारत योजनेअंतर्गत कोल्हापुरातील रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या कामाचीही प्रत्यक्ष पाहणी केली.

दक्षिण पश्चिम रेल्वे झोनच्या (एसब्ल्यूआर) लोंढा बाजूच्या प्रकल्पाचे कठीण काम पूर्ण झाले आहे, यामुळे गाड्या जलदगतीने धावतील, अशी माहिती त्यांनी दिली. यादव विशेष रेल्वेने कोल्हापुरात आले, पाहणीनंतर सांगलीकडे मार्गस्थ झाले. त्यांच्यासोबत ५० हून अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा ताफा होता.

काेल्हापुरात त्यांनी रेल्वे स्थानक, पॅनल रूम, लिनन रूम, कॅरिज डेपो, ट्रॅक मशीन, साईडिंग, रनिंग रूम आणि कोचिंग डेपोची पाहणी केली. पंचगंगा उद्यानात वृक्षारोपण केले. यावेळी पुणे विभागीय रेल्वेच्या व्यवस्थापक इंदुराणी दुबे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक मिलिंद हिरवे, स्टेशन व्यवस्थापक राजन मेहता, सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी, सुहास गुरव, जयंत ओसवाल उपस्थित होते.

मिरज-कोल्हापूर मार्गाचे लवकरच दुहेरीकरण

मिरज-कोल्हापूर मार्गाच्या दुहेरीकरणाचा आराखडा बनवला जात असून, मिरजेतील कॉर्डलाईनच्या कामाचा सर्व्हे सुरू आहे, त्याचाही आराखडा बनेल, मार्च २०२४-२५ पर्यंत पुणे-मिरज मार्गावरील दुहेरीकरणाचे तसेच सांगली-मिरज मार्गावरील काम सहा महिन्यांत पूर्ण होईल, असे यादव म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here