कोल्हापूर: श्री जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा १६०० कोटींचा तयार करण्यात आला असून त्याचे सादरीकरण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंजुरीसाठी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी प्रजासत्ताक दिन समारंभात केली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, अंदाजे ३०० कोटी रुपयांच्या कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. कोल्हापूर येथील आयटी पार्कसाठीची शेंडा पार्क येथील ३२ हेक्टर जागा लवकरच एमआयडीसीकडे हस्तांतरीत होणार आहे.
बिंदू चौक कारागृह स्थलांतराबाबतची कार्यवाही मंत्रालय स्तरावर सुरु असून प्री एनडीए ॲकॅडमी बनविण्यासाठीचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला आहे. आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्णपणे ई-ऑफीस कार्यप्रणालीचा वापर करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व वारसांचा पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते सन्मान देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदाना प्रित्यर्थ कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसांचा पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी स्वातंत्र्य सैनिक वसंतराव ज्ञानदेव माने, शांताबाई अभिमन्यू कदम, जयवंती आदगोंडा पाटील, शकुंतला बाबासाहेब घोडके, मालुताई महादेव पुरीबुवा, गीता रंगराव गुरव, छाया रंगराव भोसले, मंगला प्रभाकर वसगडेकर, वैजयंता चंद्रकांत नाईक – परुळेकर, शांताबाई भाऊसो तावडे, शांता गणपत पाटील, सुलोचना विष्णुपंत सुर्यवंशी, नजमा इमाहुद्दीन शेख यांचा सन्मान पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, महाराष्ट्र कामगार कल्याण कार्यालय, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आदी विभागांच्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त झाल्याबद्दल करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, चार सर्वोच्च शिखरे सर करुन जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरुन.. दोन वर्ल्ड रेकॉर्ड, दोन एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तीन इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, तीन इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नावाची नोंद झाल्याबद्दल कु. अन्वी चेतन घाटगे यांचा सत्कार करण्यात आला.
एकत्रित आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ॲपल हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्ट्यिूट लिमिटेड व राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैधकीय महाविद्यालय आणि सी.पी.आर रुग्णालय प्रतिनिधीचा सत्कार करण्यात आला. आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांचे ई कार्ड काढण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आरोग्य मित्र स्वप्नील पिंपळकर, सौरव वरुटे व तेजस्विनी लाड व अक्षय पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.