मित्रानेही प्रेसयीसह स्वत:ला संपवले होते; हिंजवडी खून प्रकरणात नवा खुलासा

0
42

पिंपरी :हिंजवडीतील इंजिनिअर तरुणीच्या खून प्रकरणात आता नवा खुलासा झाला आहे. संशयित ऋषभ निगम याने मित्राकडून पिस्तूल घेतले होते. त्याच्या मित्रानेदेखील प्रेयसीचा गोळ्या झाडून खून केला होता.

त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती.

वंदना के. द्विवेदी (२६) असे खून झालेल्या इंजिनिअर तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी ऋषभ राजेश निगम (रा. लखनऊ) याला पोलिसांनी अटक केली. रिअल इस्टेट ब्रोकर असलेल्या ऋषभ याला त्याच्या व्यवसायात स्वत:चा दबदबा करायचा होता.

त्यासाठी त्याने त्याचा जुना मित्र असलेल्या एका तरुणाकडून २०१५-१६ मध्ये पिस्तूल घेतले होते. त्या मित्राकडे पिस्तूल होते. दरम्यान, कामानिमित्त ऋषभ हा वंदना हिच्या घराशेजारी रहायला होता. त्यावेळी वंदना महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तिचे आणि ऋषभ यांच्यात प्रेमसंबंध जुळले. त्यातून त्यांच्यात भेटीगाठी वाढल्या.

दरम्यान, ऋषभ याच्या मित्राचेही एका मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. मात्र, २०१८-१९ मध्ये मित्र आणि त्याच्या प्रेयसीत वाद झाला. त्यातून मित्राने त्याच्या प्रेयसीवर गोळ्या झाडून तिचा खून केला. तसेच स्वत:लादेखील गोळी मारून घेत मित्रानेही आत्महत्या केली होती.

वंदना ही नोकरीनिमित्त हिंजवडी येथे आली. तसेच ती आपल्याला टाळत आहे, असे ऋषभ याला वाटू लागले. त्यातून गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यांच्यात खटके उडत होते. याचा ऋषभ याला राग होता. मित्राने ज्याप्रमाणे थंड डोक्याने प्रेयसीचे व स्वत:चे जीवन संपवले त्याचप्रमाणे ऋषभ याने देखील संशयातून आपल्या प्रेयसीला संपवले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

कुटुंबीयांकडे होणार चौकशी

वंदना आणि ऋषभ यांच्यातील संबंध कसे होते, ते एकमेकांना नेमके कधीपासून ओळखत होते, त्यांच्यातील वादाबाबत माहिती होती का, अशा विविध बाजूंनी पोलिस तपास सुरू आहे. त्यांच्या कुटुंबीयांकडे देखील त्याबाबत पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here