कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवात मंगळवारी मावळतीच्या सूर्यकिरणांनी सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी अंबाबाई मूर्तीचा चरणस्पर्श केला. त्यानंतर किरणे किंचित गुडघ्यापर्यंत सरकत लुप्त झाली.
आज बुधवारी किरणांची तीव्रता व वातावरणातील आर्द्रता योग्य राहिली तर किरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
श्री अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ झाला. पण पहिल्या दिवशी किरणांची तीव्रता कमी असल्याने किरणोत्सव होऊ शकला नाही. मंगळवारी मात्र सायंकाळी ६ वाजून १५ ते १७ मिनिटे या दोन मिनिटांमध्ये मावळतीच्या सूर्यकिरणांनी अंबाबाई मूर्तीचा चरणस्पर्श केला. यानंतर देवीची आरती करण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरासह आवारात गर्दी केली होती.
परिसरासह मुख्य चौकात देवस्थान समितीने लावलेल्या एलईडीमुळे भाविकांना हा सोहळा पाहता आला. बुधवारी किरणांची तीव्रता प्रखर राहिली व वातावरणातील आर्द्रता ४० ते ४५ लक्स इतकी राहिली तर किरणे अंबाबाई मूर्तीच्या चेहऱ्यापर्यंतदेखील येऊ शकतील असा अंदाज अभ्यासक प्रा. मिलिंद कारंजकर यांनी व्यक्त केला.
किरणांचा प्रवास असा..
महाद्वार : ५ वाजून ३० मिनिटे
गरुड मंडप : ५ वाजून ३५ मिनिटे
गणपती चौक : ५ वाजून ५३ मिनिटे
कासव चौक : ६ वाजता
पितळी उंबरा : ६ वाजून ५ मिनिटे
संगमरवरी पायरी : ६ वाजून ९ मिनिटे
कटांजन : ६ वाजून १२ मिनिटे
चरणस्पर्श : ६ वाजून १५ ते १७ मिनिटे (त्यानंतर किरणे लुप्त झाली.)