उत्तर प्रदेशातील बलिया येथे मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेतील फसवणुकीबाबत कारवाई करण्यात आली आहे. मणियार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून एकूण 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तपासात तीन सरकारी अधिकारी/कर्मचारी आणि इतर 12 लोकांची नावं समोर आली आहेत. सध्या तपास सुरू आहे. आता आणखी लोकांवर कारवाई होऊ शकते.
25 जानेवारी रोजी मणियार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत 537 जोडप्यांचा विवाह पार पडला. मात्र यातील अनेक जोडपी खोटी निघाली. काहींची आधीच लग्न झालेली होती, तर काहींना पैसे देऊन आणलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे शेकडो मुलींनी नवरदेवाशिवाय स्वत:शीच लग्न केलं. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ देखील जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेक नववधू स्वत:ला हार घालताना दिसत आहेत.
सामूहिक विवाह योजनेत अशाप्रकारे अपात्र जोडप्यांची नावे नोंदवून सरकारी पैसे वाटण्यात आले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बलिया जिल्हा प्रशासनावर बरीच टीका झाली. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी यूपी सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर, बलिया डीएमच्या सूचनेनुसार, 30 जानेवारी रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. समाजकल्याण विभागाचे दोन सहाय्यक विकास अधिकारी आणि जिल्हा समाज कल्याण विभागाच्या एका काउंटर ऑफिसरसह एकूण 15 आरोपींना अटक केली. आणखी दोन अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा दंडाधिकारी रवींद्र कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणी 30 जानेवारी 2024 रोजी एक अधिकारी आणि इतर आठ लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता. ही कारवाई पुढे करण्यात येत आहे. जो कोणी भ्रष्टाचार करतो, मग तो अधिकारी/कर्मचारी असो किंवा इतर कोणीही असो, त्याला सोडले जाणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. सामूहिक विवाह योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर अशी कारवाई होईल की ते जिल्ह्यासाठी उदाहरण ठरेल.