वाठार येथील लडगे मळ्याजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रॉलीला पाठीमागून धडकल्याने दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला.

0
54

वाठार – वारणानगर राज्य मार्गावर वाठार येथील लडगे मळ्याजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रॉलीला पाठीमागून धडकल्याने दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला.

सुनील शामराव जाधव (वय २७, रा. चांदोली वसाहत, काखे, ता. पन्हाळा) असे या मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास झाला. वडगाव पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी; काखे (ता.पन्हाळा) येथील सुनील जाधव हा वाठार भादोले रोडवरील एका कारखान्यात नोकरीत होता.

सकाळी नेहमी प्रमाणे कामावर जात असताना वाठार जवळ समोरून येणारे वाहन चुकविण्याच्या प्रयत्नात त्याचा दुचाकीवरील (एम.एच.-०९-जी.के.-०७०१) ताबा सुटला. तो पुढे जात असलेल्या ट्रॅक्टर (एम.एच.०९- एस.क्यू.-४५७४) च्या उसाच्या रिकाम्या ट्रॉलीवर जाऊन आदळला. धडकेत त्याच्या तोंडाला व डोक्याला मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. अन् उपचारापूर्वीच त्याचा जागीच मृत्यू झाला.

मोटरसायकल ट्रॉलीखाली अडकली होती. अपघातामुळे यामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. वडगाव पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने हलविली. पारगावच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाली. मयत सुनिल जाधव याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. पोलीस अंमलदार रजनीकांत वाघमारे व हवालदार अनिता फारणे पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here