Satara- एसटी आरक्षण: माण तालुका बंदच्या हाकेला १०० टक्के यश

0
57

सरकारने धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी गत सहा दिवसांपासून तीन युवक आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी निद्रेत असलेल्या राज्य सरकारला जाग आणण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने गुरुवारी माण तालुका बंदची हाक दिली होती.

त्या हाकेला म्हसवडसह प्रमुख गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आपापली दुकाने १०० टक्के बंद ठेवून बंद यशस्वी केला.

राज्यात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला राज्यघटनेने आदिवासी (एसटी)चे आरक्षण दिले आहे. मात्र, शासन धनगर व धनगड या शब्दाचा भेद करून धनगर समाजाची आजवर दिशाभूल करीत आले आहे,

यापुढे शासनाने धनगर समाजाची दिशाभूल न करता या समाजाला घटनेप्रमाणे एसटी आरक्षण मिळण्याकरिता ‘धनगड’ची ‘धनगर’ अशी दुरुस्तीची शिफारस केंद्र सरकारकडे करावी, याप्रमुख मागणींसह राज्यातील सर्व धनगर समाजाच्या न्याय व हक्काच्या मागणीसाठी केलेल्या सर्व आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत, धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करून एसटीचे सर्टिफिकेट वितरित करावे, या मागणीकरिता धनगर समाजाच्या उत्तम वीरकर, गणेश केसरकर, प्रकाश हुलवान या तीन युवकांनी म्हसवड नगरपालिकेसमोर दि. २६ पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

जोपर्यंत ‘धनगड’ची ‘धनगर’ अशी दुरुस्तीची शिफारस केंद्राला जात नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असा निर्धार या उपोषकर्त्यांनी केला. यासाठी त्यांनी गत सहा दिवसांपासून म्हसवड पालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने गुरुवार, दि. १ फेब्रुवारी रोजी माण तालुका बंदची हाक दिली होती. त्या हाकेला म्हसवडसह माण तालुक्यातील प्रमुख गावांतील अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद ठेवत धनगर समाजाच्या विविध न्याय मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला असल्याचे दिसून येते. तसेच गुरुवारी सकाळी म्हसवडमध्ये धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here