रेठरे धरण तालुका वाळवा येथील गावच्या दक्षिणेकडील बाजूस असणार्या बामणदरा नावाच्या डोंगरात एक वर्षाचा मृत बिबट्या, त्याचे चारही पाय तोडलेल्या अवस्थेत आढळून आला.
बिबट्याचा मृत्यू नेमका कधी झाला? त्याचे अज्ञाताने पाय तोडून नख्या लंपास केल्याने वन विभागाकडून श्वानपथक पाचारण करून तपास सुरू केला.
याबाबत माहिती अशी की, बामणदरा नावाने परिचित असणार्या डोंगराच्या खोर्यातील झाडीत सुमारे दहा ते पंधरा दिवसांपूर्वी मृत झालेल्या एक वर्षे वय असलेला बिबट्याचा सांगाडा वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना दिसून आला.
वन विभागाचे शिराळा येथील कर्मचारी तसेच सांगली येथील सहा उपवनसंरक्षकडॉ अजित साजणे हे पशुवैद्यकीय डॉ वंजारी यांचे सहित घटनास्थळी दाखल झाले. तपासणीनंतर मृत बिबट्याच्या पायाच्या नख्या अज्ञाताने धारधार शस्त्राने तोडून नेल्याचे दिसून आले. त्यामुळे बिबट्याची शिकार झाली की त्याचा आजारी पडून मृत्यू झाला आहे, याचा तपास केला जात आहे.
पंचनामा, शवविच्छेदन व तपासकाम सुरू केल्यानंतर मृत बिबट्याचे त्याच ठिकाणी दहन करण्यात आले. यावेळी सहाय्यक वनरक्षक अजित पाटील, वनपाल दादा बर्गे, वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी, वनरक्षक विशाल डुबल, वनपाल अनिल वाजे, रक्षक भिवा कोळेकर, हनमंत पाटील, विलास कदम, शहाजी पाटील, व प्राणीमित्र युनूस मनेर उपस्थित होते.