बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या नेतृत्वाखालील कंपनी पतंजली आयुर्वेदनं कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली कंपनी रोल्टा इंडियाला (Rolta India) ताब्यात घेण्यास स्वारस्य दाखवलं आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार, पतंजली आयुर्वेदनं ८३० कोटी रुपयांची कॅश ऑफर दिली आहे.
पतंजलीची ऑफर अशा वेळी आली आहे जेव्हा फक्त गेल्या आठवड्यात पुणेस्थित कंपनी अशदान प्रॉपर्टीजला (Ashdan Properties) बँकांनी सर्वात मोठी बोलीदार म्हणून घोषित केलं होतं.
समिती घेणार निर्णय
इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, पतंजली आयुर्वेदनं नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलला (NCLT) आपली ऑफर समाविष्ट करण्याची विनंती केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर एनसीएलटीनं एक समिती स्थापन केली आहे. ही समिती पतंजलीची बोली प्रक्रियेत समाविष्ट करायची की नाही हे ठरवणार आहे.
कर्जाच्या ओझ्याखाली कंपनी
रोल्टा इंडियानं १४०० कोटी रुपयांचं मोठं कर्ज घेतलं आहे. कंपनीची आर्थिक स्थिती बिकट असल्यानं आता कर्जाची परतफेड करण्यात अपयश येत आहे. त्यामुळे युनियन बँक ऑफ इंडियानं दाखल केलेल्या याचिकेवर जानेवारी २०२३ मध्ये दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू झाली. युनियन बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाकडून रोल्टा इंडियानं (Rolta India Loan) ७१०० कोटी रुपयांचं कर्ज घेतले आहे. त्याच वेळी, सिटीग्रुपच्या नेतृत्वाखालील बँकांकडून अनसिक्युअर्ड ६६९९ कोटी रुपये घेतले आहेत. कमल सिंह हे या कंपनीचे प्रवर्तक आहेत.
काय करते कंपनी?
ही आयटी कंपनी आहे. कंपनी डिफेन्स अँड होम लँड सिक्युरिटी, पॉवर फायनान्शिअल सर्व्हिसेस, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल आणि हेल्थकेअरमध्ये सेवा पुरवण्याचं काम करते. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कंपनीला १००० कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तर या कालावधीत महसूल केवळ ३८ कोटी रुपये होता.