शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्याकडे राज्यसभा जागा लढवण्यासाठी संख्याबळ नाही. बहुमत नसल्याने निवडणूक लढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही, असं शरद पवार म्हणालेत. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
त्यामुळे भाजप 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेस 1 असे सहा उमेदवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे.
मविआचं जागावाटप कधी?
लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही. यावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे. मविआचं जागा वाटप कधी होणार हे देखील शरद पवारांनी सांगितलं आहे. जागावाटप चर्चा चांगली झाली. जागा जिंकण महत्वाचं असलं तरी ती जागा कशासाठी जिंकतोय हे महत्वाचं असतं. 9 ते 10 फेब्रुवारीपर्यंत जागावाटपाचा तिढा सुटेल, असं शरद पवार म्हणालेत.
नितीश कुमार यांच्या भूमिकेवर पवार म्हणाले…
इंडिया आघाडीत फुटीवर शरद पवारांनी भाष्य केलं. निवडणूक होऊ द्याव्यात. नंतर एकत्रित बसू अशी भूमिका ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे. नितीशकुमार यांची भूमिका अशी का बदलली सांगू शकत नाही. इंडिया आघाडी बैठकीमध्ये नितीशकुमार यांनी आक्रमक भूमिका घेतली. भाजप विरोधी भूमिका घेतली होती. पण आता त्यांची भूमिका का बदलली हे माहित नाही, असं शरद पवार म्हणाले.
पवारांचा नरेंद्र मोदी यांना टोला
सत्तेचा गैरवापर होतो त्याला पर्याय राहिलेला नाही. शेवटी सामान्य जनतेसमोर जावं लागेल. सोरेन आदिवासी नेता आहेत. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येत आहेत. जसं गुजरातला सगळं देण्यासाठी ते धैर्य दाखवत असतात. तसं महाराष्ट्र राज्याला पण द्यावं, असा टोलाही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.