मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि उत्कृष्ट नट असलेले सर्वांचे लाडके मामा अशोक सराफ यांना नुकताच शासनाचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. अशोक सराफ यांनी त्यांच्या चतुरस्त्र अभिनयाने प्रेक्षकांची हृदयात स्थान मिळवलं आहे.
विनोदी, गंभीर अशी कुठलीही भूमिका असो त्यांनी कायमच अभिनयाची बॅटिंग केली आहे. मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही छाप पाडणाऱ्या अशोक सराफ यांच्याबद्दल बोलतानाचा राज ठाकरेंचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
एका फॅन पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत मनसे अध्यक्ष राज ठाकरे अशोक सराफ यांचं कौतुक करत आहेत. ते म्हणतात, “ज्या व्यक्तीला आपण लहानपणापासून पाहत आलो. मी त्यांची अनेक नाटके आणि सिनेमे पाहिले आहेत. त्यांचं डार्लिंग डार्लिंग हे नाटक मला अजूनही आठवतं. त्या काळापासून आत्तापर्यंत मला वाटतं अशोक सराफ हे एकमेव अभिनेते आहेत की समोर कोणीही असू दे त्यांना फरक पडला नाही. नाटकावर आणि चित्रपटावर ते स्वत:ची छाप पाडायचे. ही साधी सोपी गोष्ट नाही.”