शरद पवारांना मोठा धक्का; पक्षाच्या नांवासह चिन्ह ही अजित पवार गटाला, निवडणूक आयोगाचा धक्कादायक निर्णय

0
142


प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा


राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाच्या चिन्हावर शरद पवार गटासह अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटानेही दावा सांगितला होता. त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला आणि याप्रकरणी झालेल्या सुनावणी नंतर आज आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्याने हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवार गटाला आता निवडणुकीला सामोरे जाताना नव्या पक्षासह आणि चिन्हासह निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागणार आहे.

भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या सत्तेत सहभागी होण्याच्या मुद्द्यावरून शरद पवार आणि अजित पवारांमध्ये मतभेद झाले. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांचा विरोध झुगारून महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे ४१ आमदार अजित पवारांसोबत गेले तर उर्वरित आमदारांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. दोन्ही गटांनी पक्षावर दावा सांगितल्याने अखेर हे प्रकरण निवडणूक आयोगासमोर गेले. आयोगासमोर तब्बल १० वेळा झालेल्या सुनावणीनंतर आज निवडणूक आयोगाने अजित पवारांचा गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचं सांगत पक्षाचं चिन्ह ही त्यांना दिलं आहे.

दरम्यान, काही दिवसांत होणारी राज्यसभेची निवडणूक आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी शरद पवार गटाला आता पक्षाचं नवीन नाव आणि नवीन चिन्हाचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here