Kolhapur: उतावीळ तलाठी अन् गावात लागलं होर्डिंग, नियु्क्तीआधीच झळकले पोस्टर

0
106

कोल्हापूर : तलाठी भरतीसाठीच्या निवड यादीत समावेश झाला, तोपर्यंत शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी तलाठीपदी नियुक्ती झाल्याचे मोठमोठे डिजिटल झळकू लागले आहेत. कागदपत्रांची पडताळणी, तपासणी पूर्ण होऊन प्रत्यक्ष निवडीचे पत्र देण्याला अजून महिन्याभराचा कालावधी लागणार आहे, तोपर्यंत यांची अवस्था म्हणजे उतावीळ नवरा अन् गुडघ्याला बाशिंग अशी झाली आहे.

जिल्ह्यात ५५ तलाठी पदांसाठी दिवाळीपूर्वी परीक्षा झाली, त्याच्या निकालातील घोळानंतर कट ऑफ लिस्टप्रमाणे निवड यादी जाहीर करण्यात आली. ही निवड यादी म्हणजेच तलाठीपदी नियुक्ती असाच बहुधा उमेदवारांचा समज झाला आहे. कारण शहरात विशेषत: ग्रामीण भागात उमेदवारांची तलाठीपदी नियुक्ती झाल्याने अभिनंदन केल्याचे मोठमोठे डिजिटल लागले आहेत. नियुक्तीसाठी परीक्षा पास होणे हाच महत्त्वाचा टप्पा असला तरी त्या पुढच्या सर्व प्रक्रियांमधून पार पडणेही तितकेच बंधनकारक असते.

निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. ५५ पैकी ४ उमेदवार आले नाही. ५१ उमेदवारांनी कागदपत्रे सादर केली. प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी आपली हजेरी नोंदवली यानंतर पुढील फेरतपासण्या करून प्रत्यक्ष नियुक्तिपत्र द्यायला किमान एक महिन्याचा कालावधी लागेल असे जिल्हा प्रशासनाच्या आस्थापना विभागाने स्पष्ट केले. पण नियुक्तिपत्र मिळण्याआधीच भावी तलाठ्यांच्या अभिनंदनाचे पोस्टर लागले आहेत.

अशी असेल पुढील कार्यवाही

उमेदवारांनी सादर केलेली सर्व कागदपत्रे त्या त्या विभागांना पाठवून ही कागदपत्रे, दाखले प्रमाणपत्र विभागानेच दिले आहेत का याची फेरतपासणी केली जाते. यामध्ये माजी सैनिक, सैनिक, खेळाडू, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन कर्मचारी या वर्गवारीचा समावेश आहे. त्या विभागांकडून कागदपत्रांवर शिक्कामोर्तब झाला तर या वर्गातील उमेदवारांच्या अन्य कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्तिपत्र दिले जाते.

जात प्रमाणपत्रासाठी ६ महिने

मागासवर्गीय उमेदवारांना त्यांचे जातप्रमाणपत्र सादर करण्यासाठी ६ महिन्यांची मुदत दिली जाते. जे उमेदवार सर्वसाधारण (ओपन) मधून उत्तीर्ण झाले आहेत, त्यांची नियुक्ती जवळपास निश्चितच झाल्यात जमा असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here