कळंब्यात आढळले मृतावस्थेतील अर्भक, संशयितांचा शोध सुरू.

0
238

कोल्हापूर:(प्रतिनिधी )प्रियंका शिर्के-पाटील

कोल्हापूर : कळंबा (ता. करवीर) येथील कात्यायनी कॉम्प्लेक्स परिसरातील एका बोळात आज बुधवार (दि. २३ऑगस्ट ) सकाळी मृतावस्थेतील स्त्री जातीचे अर्भक आढळले. या बाबतची माहिती प्रशांत जवळीमठ यांनी देताच करवीर पोलिसांनी घटनास्थळाची भेट घेऊन मृत अर्भक उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवले. दरम्यान, अर्भक टाकणाऱ्या संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, कळंबा येथील कात्यायनी कॉम्प्लेक्स परिसरात प्रशांत जवळीमठ यांच्या घराच्या मागे असलेल्या बोळात कापडात गुंडाळलेले मृतावस्थेतील अर्भक आज बुधवार (२२ ऑगस्ट ) सकाळी आढळले.

हा प्रकार लक्षात येताच जवळीमठ यांनी करवीर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक निवास पवार, हवालदार दत्ता बांगर, संग्राम पाटील घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांनी उत्तरीय तपासणीसाठी अर्भक सीपीआरमध्ये पाठवले.

पूर्ण वाढ झालेले अर्भक अज्ञाताने नाळेसहीत टाकले होते. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील बघ्यांनी गर्दी जमली होती . घरातच प्रसूती झाल्यानंतर संशयितांनी मध्यरात्रीच्या सुमारास अर्भक फेकले असावे. अर्भकाचा मृत्यू कधी झाला, याची माहिती उत्तरीय तपासणीनंतरच मिळेल असे उपनिरीक्षक निवास पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here