गेल्या काही वर्षांत मोबाइलच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट करण्याचं प्रमाण वाढलं आहे. सध्या यासाठी विविध अॅप्सदेखील उपलब्ध आहेत. एकीकडे ऑनलाइन पेमेंट आणि बँकिंग अॅप्सना जोरदार प्रतिसाद मिळत असताना, काही पेमेंट अॅप्स वेगवेगळ्या कारणांमुळे सातत्याने चर्चेत आहेत.
काही दिवसांपासून पेटीएमसंदर्भात जोरदार चर्चा आणि वादविवाद सुरू आहेत. त्यातच आता ऑनलाइन यूपीआय पेमेंट अॅप ‘भारत-पे’ला कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं एक नवीन नोटीस जारी केली आहे. त्यामुळे ऑनलाइन पेमेंट अॅपचा वापर करणाऱ्या युझर्समध्ये एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे हे यूपीआय अॅप बंद तर होणार नाही ना असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. सरकारने ‘भारत पे’ला नेमकी का नोटीस बजावली आहे.
ऑनलाइन पेमेंट आणि बँकिंग अॅप पेटीएम याविषयीचा वाद सुरू असताना आता ‘भारत पे’ला एक नवीन नोटीस मिळाली आहे. ऑनलाइन यूपीआय पेमेंट अॅप आणि फिनटेक कंपनी ‘भारत पे’ला कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालायानं नोटीस पाठवली आहे.
2022 च्या सुरुवातीपासून ‘भारत पे’मध्ये वाद सुरू आहेत. चार वर्षं जुनी असलेली ही कंपनी 2022च्या सुरुवातीलाच वादात सापडली होती. त्यावेळी नायकाच्या आयपीओमध्ये अलॉटमेंट न मिळाल्याने अपशब्द वापरल्याचा आणि कोटक ग्रुपच्या एका कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप या कंपनीच्या संस्थापकावर करण्यात आला होता.
या वादानंतर अश्नीर ग्रोव्हर यांनी ‘भारत पे’च्या व्यवस्थापकीय संस्थापक (एमडी) पदाचा राजीनामा दिला होता. परंतु, कंपनीने त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सर्व आर्थिक व्यवहारांचं फॉरेन्सिक ऑडिट सुरू केले.
त्यानंतर कंपनीने अश्नीर ग्रोव्हर यांच्याविरुद्ध एक दिवाणी खटला दाखल केला. यात बनावट बिलं तयार करून वैयक्तिक वापरासाठी कंपनीच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. फसवे व्यवहार आणि बनावट विक्रेते यांच्या आरोपांव्यतिरिक्त कंपनीने अश्नीर ग्रोव्हर यांनी ‘भारत पे’चं तंत्रज्ञान किंवा संकल्पनेत काहीही योगदान केलं नसल्याचा आरोप केला होता. त्यात म्हटलं होतं की, अश्नीर ग्रोव्हर 2018 पासून कंपनीशी संबंधित आहेत. त्या वेळी त्यांनी 31,920 रुपयांची किरकोळ गुंतवणूक केली होती. त्या बदल्यात त्यांना 3192 शेअर्स मिळाले होते.
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने कंपनीचे संस्थापक राहिलेल्या अश्नीर ग्रोव्हर यांच्यावर करण्यात आलेल्या कायदेशीर कारवाईबाबतची माहिती कंपनीकडं मागितली आहे. मंत्रालयाने कंपनीकडून अश्नीर ग्रोव्हरविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी खटल्यात कंपनीने सादर केलेल्या पुराव्यांबाबत माहिती मागवली आहे.
याबाबत ‘भारत पे’ने एक निवेदन जारी केलं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, रजिस्ट्रार ऑफ कंपनीने पत्र पाठवून काही अतिरिक्त माहिती मागितली आहे. मागितलेली ही माहिती सुरू असलेल्या तपासाचा एक भाग आहे. तो तपास अंतर्गत प्रशासन पुनरावलोकनानंतर सुरू झाला होता आणि ती माहिती कंपनीने तिच्या ऑडिटेड रिझल्टमधून पुढे आणली होती.आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करत आहोत, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.