अभिषेक घोसाळकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार; जाणून घ्या गोळीबाराचा संपूर्ण घटनाक्रम

0
114


मुंबई : मुंबईच्या दहीसरमधील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली असून यात त्यांचा मृत्यू झाला आहे. मॉरिस नरोना नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरु असताना गोळ्या झाडल्या. घोसाळकरांवर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसने स्वतःवर देखील गोळ्या झाडून आत्महत्या केली.

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र होते. मॉरिस भाई नावाने प्रसिद्ध असलेला हा व्यक्ती स्वतःला समाजसेवक म्हणतो. मॉरिस भाई हा आमदार सुनील राणे यांच्या जवळचा असल्याचं बोललं जातंय. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई यांच्यात आधी अनेक वाद होते मात्र दोघांमधील वाद संपवून हे दोघे एकत्र आले. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे गुरुवार ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी मॉरिस भाईच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह आले होते. या लाईव्हमध्ये मॉरीस भाईने अभिषेक घोसाळकर यांचं स्वागत केलं आणि सर्व मतभेद विसरून आपण दोघे एकत्र आल्याचे त्याने सांगितलं. त्यानंतर दोघेजण त्यांच्या परिसरासाठी कोणत्या गोष्टी करणार आहोत? याविषयी त्यांनी माहिती दिली. मात्र त्यानंतर पुढच्या काही क्षणात ही गोळीबाराची घटना घडली.दरम्यान अभिषेक घोसाळकर यांच्यावर आज ९ फेब्रुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा दुपारी ३ वा त्यांचं निवासस्थान बोरिवली पूर्व येथून सुरू होणार आहे. त्यांच्यावर दौलत नगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तर मॉरीसचे कुटुंब परदेशात आहे, त्यामुळे त्याचा मृतदेह दोन दिवसानंतर कुटुंबाला दिला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here