१०५ लोकांना फसवले, बिल्डर टेकचंदानीच्या मालमत्तेवर ईडीच्या धाडी

0
76

: नवी मुंबईमधील तळोजा येथे एका गृहनिर्माण प्रकल्पात १०५ लोकांची फसवूणक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेला बिल्डर ललित टेकचंदानी याच्याशी संबंधित ठिकाणी ईडीने छापेमारी केली.

याच प्रकरणात अटकेत असलेल्या त्याच्या अन्य साथीदारांशी निगडीत ठिकाणीही बुधवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले आहेत.

सुप्रीम कन्स्ट्रक्शन या नावाची ललित टेकचंदानी याची कंपनी आहे. या कंपनीद्वारे तळोजामध्ये गृहनिर्माण प्रकल्पाचे बांधकाम सुरू होते. नियमानुसार बुकिंग करणाऱ्या लोकांना २०१७-१८ साली घराचा ताबा मिळणे अपेक्षित होते.

मात्र, २०१६मध्ये अचानक या प्रकल्पाचे बांधकाम थांबविण्यात आले. सुमारे १०५ लोकांनी घरासाठी लाखो रुपये भरले होते. लोकांना ना घर मिळाले ना पैसे. त्यामुळे घराचे बुकिंग करणाऱ्या चेंबूर येथील एका रहिवाशाने टेकचंदानी याच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली.

गेल्या महिन्यात मुंबई पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी टेकचंदानी याची नऊ तास चौकशी करून त्याला अटक केली. सर्वसामान्य लोकांकडून घेतलेल्या पैशांतून टेकचंदानी याने अन्य ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्याचा संशय असून, ईडीचे अधिकारी तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here