‘या’ सरकारी कंपनीला ₹२५,४६४ कोटींचा आयकर रिफंड मिळणाची अपेक्षा; शेअर वधारला, एक्सपर्ट बुलिश

0
130

भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीला (LIC Share) 25,464 कोटी रुपयांची आयकर रिफंड ऑर्डर मिळाली आहे आणि चालू तिमाहीत (जानेवारी-मार्च, 2024) ते मिळण्याची शक्यता आहे. एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी ही माहिती दिली.

कंपनीच्या शेअर्समध्ये आज म्हणजेच सोमवारी 6 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत 1150 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. काही काळानंतर दुपारच्या सत्रादरम्यान शेअरमध्ये 2.80 टक्क्यांची घसरण होऊन ते 1050.60 रुपयांच्या पातळीवर आले.

‘1300 वर जाणार शेअर’

इकॉनॉमिक्स टाइम्सच्या अहवालानुसार, ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गन एलआयसीवर बुलिश आहे. ब्रोकरेज फर्मनं म्हटलं. की आगामी काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 1340 रुपयांच्या पातळीवर जाऊ शकते. हा अंदाज खरा ठरला, तर आगामी काळात पोझिशनल गुंतवणूकदारांना आणखी फायदा होऊ शकतो.

कंपनीनं काय म्हटलं?

गेल्या महिन्यात, आयकर विभागाच्या आयकर अपील न्यायाधिकरणानं (ITAT) 25,464.46 कोटी रुपयांच्या परताव्याची नोटीस जारी केली होती. परतावा हा मागील सात मूल्यांकन वर्षांमध्ये विमाधारक व्यक्तींना दिलेल्या अंतरिम बोनसशी संबंधित आहे. “आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत आणि या तिमाहीतच आयकर विभागाकडून परतावा मिळण्याची आशा आहे,” असं मोहंती यांनी तिमाही निकाल जाहीर करताना सांगितलं. या तिमाहीत एलआयसी बाल संरक्षणासह आणखी नवीन प्रोडक्ट्स आणणार असल्याचंही ते म्हणाले.

निव्वळ नफ्यात वाढ

गेल्या आठवड्यात तिसऱ्या तिमाहीचे (ऑक्टोबर-डिसेंबर, 2023) निकाल जाहीर करताना, सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी एलआयसीनं दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत तिचा निव्वळ नफा 49 टक्क्यांनी वाढून 9,444 कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनील 6,334 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.

(टीप – यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here