इन्स्टावर मैत्री, दहावीची परीक्षा सोडून बॉयफ्रेंडसाठी ‘तिने’ केला 1300 किमीचा प्रवास अन्…

0
162

प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. अशी एक घटना आता समोर आली आहे. बिहारच्या मधुबनी येथील दहावीची विद्यार्थिनी गेल्या एक महिन्यापासून घरातून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही.

बिहार पोलिसांनी सखोल तपास केला असता ती मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील सुंदरेल गावात एका तरुणासोबत राहात असल्याचं समोर आलं.

पोलीस तरुणाच्या घरी पोहोचले. तसेच मुलीचे कुटुंबीय देखील आले. मात्र मुलगी त्यांच्यासोबत जायला तयार नव्हती. पोलिसांना तिची समजूत काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, खरगोन जिल्ह्यातील भिखनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुंदरेल गावात राहणारा आकाश राठोड याची इन्स्टाग्रामवर एका 17 वर्षीय मुलीशी मैत्री झाली.

मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात झालं आणि 27 दिवसांपूर्वी ही अल्पवयीन मुलगी बिहारहून ट्रेनने एकटीच सुंदरेल येथे आली. त्यानंतर ती तिच्या प्रियकरासोबत एका ठिकाणी राहू लागली. दुसरीकडे मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी मुलीचा शोध घेतला असता मध्य प्रदेशातील सुंदरेल गावात ती असल्याचं कळलं.

पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आकाशला अटक करून मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं. अल्पवयीन मुलीने पोलीस ठाण्यात खूप गोंधळ घातला आणि ती रडू लागली. ती कोणत्याही परिस्थितीत आकाशला सोडायला तयार नव्हती. पोलिसांनाही तिची समजूत काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले, त्यानंतरच तिने कुटुंबासोबत जाण्यास होकार दिला. तसेच नंतर लग्न करून देऊ असं आश्वासनही कुटुंबीयांनी तिला दिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here