भव्यदिव्य ‘शिवबा’ महानाट्याने रत्नागिरीकरांवर घातलं गारुड

0
72

रत्नागिरी : ३५० वर्षे जुलमातून, गुलामशाहीचे काहूर माजलेले, गुलामशाहीने सह्याद्रीच्या कड्यांना भेगा पडताहेत. धरणी माता अन्यायाने, जुलमाने तप्त झाली आहे. पारतंत्र्याची भीषण काळरात्र संपवण्याची आता वेळ आली आहे..

स्वतंत्र स्वराज्य निर्माण करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची शपथ घेत आहे. युध्द हे फौजेच्या जिवावर नाही तर निष्ठेवर लढले जाते, याचा साक्षात्कार घडविणारे कोकण कला अकादमी प्रस्तुत प्रेरणा प्रोडक्शन निर्मित इतिहासाच्या पानावरचं एक सुवर्ण पान, ८० कलाकरांच्या भव्यदिव्य ‘शिवबा’ महानाट्याने रत्नागिरीकरांवर गारुड घातलं.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रा. प्रदीप ढवळ लिखित आणि मंदार टिल्लू दिग्दर्शित ‘शिवबा’ या महानाट्याचा भव्य प्रयोग मंगळवारी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात झाला. तत्पूर्वी कोकण नमन कला मंचच्यावतीने नमन ही पारंपरिक लोककला सादर करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणरायाच्या नमनाने झाली. नमनानंतर रामायणातील एक छोटा प्रसंग सादर करण्यात आला. सुरुवातीला ‘वस्त्रहरण’ नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर, प्रा. ढवळ, टिल्लू यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, प्रशिक्षणार्थी आयएएस डॉ. जस्मिन, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यावेळी उपस्थित होते.

संत एकनाथांच्या ‘दार उघड बया, दार उघड .’या भारुडापासून महानाट्याची सुरुवात होते. तेराव्या शतकापासूनचा इतिहास मांडत हे कथानक पुढे सरकते. स्वराज्याचे प्रेरणास्थान शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांची भूमिका विशेष अधोरेखित होते. आई तुळजा भवानीच्या साक्षीने स्वराज्याचे पाहिलेले स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तत्वाने पूर्ण झाले. उत्तम सादरीकरण संगीत, चलचित्राच्या माध्यमातून पार्श्वभूमी शिवकाळाचा इतिहास आणि प्रसंग जिवंत केले आहेत.

स्वराज्याची संकल्पना, त्यामागची प्रेरणा आणि इतिहास नव्या पिढीसमोर उभा केला आहे. तलवार बाजी, दांडपट्टा आणि ‘हर..हर.. महोदव..च्या गर्जनेने थंडीतही भान विसरायला लावून रसिक प्रेक्षकांना देखील स्फूरण चढले आणि समस्त रसिक प्रेक्षकांच्या गर्दीतूनही मग ‘हर हर महादेव..छत्रपती शिवाजी महाराज की जय..!’ केवळ आणि केवळ हाच जयजयकार होताना अनुभवला मिळाला. नाटक संपल्यानंतरही रसिकांच्या मनावर या नाटकाचे गारूड कायम हाेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here