मुरगूड : लिंगनूर (कापशी) येथे बहिणीशी प्रेमविवाह केला म्हणून सख्ख्या बहिणीचा खून करून फरार असलेल्या तीन संशयित आरोपींना मुरगूड पोलिसांनी आंध्र प्रदेशातून अटक केली. खुनाची घटना ६ फेब्रुवारी रोजी घडली होती.
दरम्यान, चंदगड येथील एका खुनाचा उलगडा या आरोपीकडून झाला आहे.
अधिक माहिती अशी, लखनवाडा (जि. बुलढाणा) येथील सिकसेन मुरलीधर भोसले याने सन २००७ साली अंजनगाव (जि. अमरावती) येथील पवार कुटुंबातील येवनबाई हिला प्रेम प्रकरणातून पळवून नेऊन लग्न केले होते. तेव्हापासून सिकसेन तिला माहेरी पाठवत नव्हता. याचा राग देवेंद्र पवार, टायटन पवार यांना होता. त्यातून त्यांनी सिकसेनला ६ फेब्रुवारी रोजी फोनवरून लिंगनूर (कापशी) येथे बोलावून घेतले. तेव्हा त्यांच्यात वाद सुरु झाला.
सिकसेनला मारत असतानाच येवनबाई मध्ये आली, तेव्हा तिला भाल्याने भोसकले. त्यात ती जागीच ठार झाली होती. यावेळी देवेंद्रप्पा आदमास पवार (वय २०), पीयूष उर्फ टायटन पवार (वय २२), चरण उर्फ शंकर शकराप्पा पवार (वय ३०, रा. अंजनगाव, जि. अमरावती) हे तिघेही घटनास्थळावरून फरार झाले होते.
या घटनेची मुरगूड पोलिसात नोंद झाली होती. फोनच्या लोकेशनवरून माहिती मिळताच मुरगूड पोलिसांनी या तिघा आरोपींना आंध्र प्रदेशातील भिमावरम येथे पकडून अटक केली. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली. या तिघा जणांनी एक वर्षापूर्वी पाटणे फाटा (चंदगड) येथील अर्जुन रवी शिंदे याचा पाटणा (बिहार) येथे खून केल्याचेही उघड झाले आहे.
या कारवाईत मुरगूड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे, हवालदार संदीप ढेकळे, प्रशांत गोजारे, बजरंग पाटील, अमर पाटील, मधुकर शिंदे, संतोष भांदीगरे, संदीप लाड, अमर कुंभार व सतीश वर्णे सहभागी झाले होते.