पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी (19फेब्रुवारी) त्यांच्या राज्यातील काही नागरिकांचं आधार कार्ड युनिक आयडेंटिफेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI)निष्क्रिय केल्याचं म्हटलं होतं.
त्यावरUIDAIने प्रतिक्रिया दिली आहे. कोणाचंही आधार कार्ड निष्क्रिय केले नसल्याचं म्हणत त्यांनी समस्या असलेल्या युजर्सना अधिकृत वेबसाइटवर तक्रार करण्यास सांगितलं आहे. ओळखपत्र म्हणून आधारचा सर्वाधिक वापर केला जातो. याचा वापर अनुदानं आणि विविध सरकारी योजना व सेवांचा लाभ घेण्यासाठी केला जातो. आधार डेटाबेसची अचूकता राखण्यासाठी प्राधिकरण कागदपत्रं अपडेट करत असल्याचंUIDAIने आपल्या वेबसाइटवर म्हटलं आहे.
UIDAIने म्हटलंय की डेटाबेस अपडेट करताना आधार क्रमांकधारकांना वेळोवेळी सूचना जारी केल्या जातात. या संदर्भात स्पष्ट करण्यात आलंय की,कोणताही आधार क्रमांक रद्द करण्यात आलेला नाही. कोणत्याही आधार क्रमांक धारकाची काही तक्रार असल्यास ते त्यांची तक्रारUIDAIकडे पाठवू शकतात. त्यांचा समस्येचं निरसन केलं जाईल. कोणत्याही आधार कार्डधारकाची याबाबत काही तक्रार असल्यास तेhttps://uidai.gov.in/en/ contact-support/feedback.htmlवर त्यांची तक्रार पाठवू शकतात.
ममता बॅनर्जी यांनी काय म्हटलं होतं?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी आरोप केला होता की भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वीराज्य सरकारच्या विविध सामाजिक कल्याण योजनांचा लाभ मिळू नये म्हणून राज्यातील नागरिकांचं आधार कार्ड निष्क्रिय केलं आहे. बीरभूम येथील एका कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसले तरीही त्यांचे सरकार राज्य-कल्याणकारी कार्यक्रम सुरू ठेवेल.
“सावधगिरी बाळगा,ते (भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकार) आधार कार्ड निष्क्रिय करत आहेत. बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये अनेकांची आधार कार्डं निष्क्रिय करण्यात आली आहेत. निवडणुकीपूर्वी बँक हस्तांतरण आणि मोफत रेशनच्या माध्यमातून ‘लक्ष्मी भंडार’सारख्या योजनांचा लाभ लोकांना मिळू नये म्हणून ते हे करत आहेत. आधार कार्ड नसले तरी लोक लाभापासून वंचित राहू नयेत,यासाठी मुख्य सचिवांना मी स्पष्ट आदेश दिले आहेत. बंगालच्या जनतेने काळजी करण्याची गरज नाही. पूर्व वर्धमान जिल्ह्यातील जमालपूर आणि बीरभूम,उत्तर आणि दक्षिण24परगणा तसेच उत्तर बंगालमधील50नागरिकांची आधार कार्ड डी-लिंक करण्यात आली आहेत,”असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता.