बिबट्याला जाळ्यात अडकवून त्यावर उभा राहिला पोलीस, नंतर झाला मृत्यू

0
84

गेल्या काही वर्षांमध्ये मानव आणि वन्य प्राण्यांचा संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे. माणसाने वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासांमध्ये अतिक्रमण केल्याने वन्य प्राणी मानवी वस्तीत येऊ लागले आहेत.

उत्तर प्रदेशातील संभलमध्ये अशीच एक घटना घडली आहे. तिथे एका घरात बिबट्या घुसला होता. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी आलं होतं. भरपूर प्रयत्न केल्यानंतर या बिबट्याला पकडण्यात यश आलं. मात्र, हा बिबट्या पकडताना सरकारी कर्मचाऱ्यांकडून एक गंभीर चूक झाली. त्यांनी त्याच्या अंगावर कॉट टाकून त्याला दाबण्याचा प्रयत्न केला. या कॉटांवर अनेक पोलीस जवळपास तासभर उभे होते. अंगावर एवढं वजन पडल्यामुळे संबंधित बिबट्याची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, संभल येथील हयातनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात बिबट्या शिरला होता. बिबट्याच्या दहशतीखाली जगत असलेल्या ग्रामस्थांनी या बाबत पोलीस व वन विभागाला माहिती दिली होती. बिबट्याला पकडण्यासाठी आलेल्या पथकाने बराच वेळ प्रयत्न करून बिबट्याला जाळ्यात पकडलं. या वेळी काही पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी जखमी झाले. बिबट्याला जेरबंद केल्यानंतर पोलिसांनी त्यावर अनेक कॉट टाकल्या. या कॉटांवर पोलीस उभे राहिले. हे पोलीस सुमारे तासभर बिबट्याला पायाखाली तुडवत होते. शेवटी बिबट्या बेशुद्ध झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतर मात्र, पोलीस कर्मचारी घाबरले. बेशुद्ध असलेल्या बिबट्याला उपचारांसाठी मुरादाबादला नेण्याची तयार करण्यात आली. मात्र, या बिबट्याचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेमुळे आता पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमवर टीका होत आहे. बिबट्याला जीव गमवावा लागेल एवढी असंवेदनशीलता का दाखवली गेली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वन्य प्राणी गावांमध्ये शिरल्याच्या अनेक घटना सातत्यानं घडतात. विशेषत: जंगलांच्या आणि अभयारण्यांच्या जवळपास असलेल्या गावांमध्ये हे प्रकार जास्त होतात. काहीवेळा वन्य प्राणी मानवी वस्तीत येऊन माणूस आणि पाळीव प्राण्यांवर हल्लेदेखील करतात. या प्राण्यांना पकडण्यासाठी वन विभागाला कसरत करावी लागते. मात्र, काही वेळा त्यांच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या प्राण्याला आपला जीवही गमवावा लागतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here