कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर परिसर तीर्थक्षेत्र विकासासाठी नगरविकास विभागाने ४० कोटींचा निधी मंजूर केला असून, शुक्रवारी शासन निर्णयअंतर्गत याचा अध्यादेश काढण्यात आला आहे.
या निर्णयामुळे अंबाबाई मंदिराच्या परिसर विकासाला चालना मिळणार आहे. अंबाबाई मंदिर विकास कॉरिडॉरसाठीच्या १४०० कोटींचा आराखड्याचा हा पहिला टप्पा असेल.
अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील ८० कोटींच्या विकासकामांना २०१९ साली मंजुरी देण्यात आली होती. त्यांपैकी आलेल्या १० कोटी ७० लाखांच्या निधीत बहुमजली पार्किंगचे काम करण्यात येत आहे.
प्रथम टप्प्यात मंजूर केलेल्या निधीपैकी चालू आर्थिक वर्षात ६९.२६ कोटींच्या मागणीचा प्रस्ताव नियोजन व वित्त विभागाला सादर करण्यात आला होता. त्यानुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या पूरक मागणीद्वारे सहायक अनुदाने (वेतनेतर) या लेखाशीर्षाखाली ४० कोटी इतका निधी उपलब्ध करुन दिला असून, निधी वितरित करण्यास नियोजन व वित्त विभागाने मंजुरी दिली आहे.
अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी चालू वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून रु. ४० कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, उपलब्ध करून दिलेल्या निधीपेक्षा जास्तीचे दायित्व घेण्यात येऊ नये, असे अध्यादेशात म्हटले आहे.
पावनखिंडसाठी १५ कोटी
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव योजनेंतर्गत पावनखिंड येथे शासकीय विश्रामगृह बांधण्यासाठी १४ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.