Kolhapur: वर्चस्ववादातून विद्यार्थ्यांच्या दोन गटात फिल्मी स्टाईलने हाणामारी, दोघे गंभीर

0
179

हातकणंगले : सांगली – कोल्हापूर मार्गावरील अतिग्रे येथील नामांकित विद्यापीठाच्या एम.बी.ए. शाखेच्या कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील विद्यार्थ्यांच्या दोन गटांत मंगळवारी दुपारी वर्चस्व वादातून दगड, चप्पल, चाकूचा वापर करून फिल्मी स्टाईलने झालेल्या हाणामारीत दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले.

या हाणामारीनंतर यड्रावमधील काही युवक आणि विद्यार्थ्यांनी विद्यापीठामध्ये घुसून सिक्युरिटी गार्ड, एम.बी.ए. शाखेच्या प्राध्यापक – कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्याचे काम हातकणंगले पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, अतिग्रे येथील विद्यापीठामध्ये चार दिवसांपासून वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडा महोत्सव सुरू आहे. विद्यापीठाच्या एम.बी.ए. शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये सरकार ग्रुप आणि बागे ग्रुप असे दोन गट आहेत. या दोन गटात सोमवारी जोरदार वादावादी झाली होती. यावर हातकणंगले पोलिसांनी संबंधिताना समज देऊन सोडून दिले होते.

मंगळवारी दुपारी हा वाद पुन्हा उफाळला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी केलेल्या चाकूहल्ल्यात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. जखमी विद्यार्थ्याच्या यड्राव येथील समर्थकांनी विद्यापीठात जाऊन प्रचंड राडा घातला. त्यांच्याकडून सिक्युरटी गार्डपासून प्रशासनातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना जोरदार मारहाण करण्यात आली. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हातकणंगले पोलिस घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. गंभीर जखमी विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हाणामारीचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here