
Recipe: रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचे हा मोठा प्रश्न महिलांना असतो. नाश्ता टेस्टी असण्यासोबतच हेल्दी देखील असावा यासाठी ते विविध प्रकारचे पदार्थ बनवत असतात. नाश्त्याला तळलेले पदार्थ खायचे नसतील तर तुम्ही पोह्यापासून टेस्टी उत्तपम बनवू शकता.
ही रेसिपी फक्ट टेस्टी नाही तर हेल्दी सुद्धा आहे. विशेष म्हणजे हे तयार करायला जास्त वेळ लागत नाही. चला तर मग जाणून घेऊया झटपट तयार होणारी पोहे उत्तपमची रेसिपी
पोहे उत्तपम बनवण्यासाठी साहित्य
– १ वाटी पोहे
– अर्धी वाटी रवा
– १ वाटी दही
– १ कांदा बारीक चिरलेला
– १ टोमॅटो बारीक चिरलेला
– १ सिमला मिरची
– १ गाजर
– २-३ हिरव्या मिरच्या
– कोथिंबीर बारीक चिरलेली
– २ चमचे भाजलेले शेंगदाणे
– १/४ चमचा काळी मिरी पावडर
– मसाला
– लाल तिखट
– काळे मीठ
– बेकिंग सोडा
– एक ते दोन चमचे तेल
– मीठ
पोहे उत्तपम बनवण्याची पद्धत
हा हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम पोहे पाण्याने धुवून घ्या. नंतर त्यात रवा आणि दही घालून मिक्स करा. आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि सुमारे दहा मिनिटे फुगायला बाजूला ठेवा.
दहा मिनिटांनी हे फुलल्यावर याची पेस्ट बनवा. पेस्ट बनवण्यासाठी पोहे आणि रव्याचे मिश्रण मिक्सर जारमध्ये टाका. हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाणे आणि मीठ एकत्र मिक्स करा.
थोडे पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट एका मोठ्या बाउलमध्ये काढून मिक्स करा. आता यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, कोथिंबीर, गाजर या बॅटरमध्ये मिक्स करून घ्या.
तुम्ही यात तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या जसे बीन्स किंवा ब्रोकोली सुद्धा घेऊ शकता. आता या बॅटरमध्ये काळी मिरी पावडर घालून मिक्स करा. शेवटी अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करा. तसेच थोडे गरम पाणी घाला. हे बॅटर नीट मिक्स करा.
आता तवा गरम करून त्यावर एक चमचा तेल घाला. गरम तव्यावर बॅटर टाकून गोल आकारात फिरवा. त्यावर वरून हव्या त्या भाज्या घाला. झाकण ठेवून दोन्ही बाजूंनी पाच मिनिटे शिजवा. तुमचे पोहे उत्तपम तयार आहे.


