कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने लाभार्थ्यांना गृहोपयोगी संचाचे वाटप करताना शुक्रवारी गोंधळ उडाला. पाचशे लाभार्थ्यांना बोलावले असताना जिल्ह्यातून पाच हजार लाभार्थी आल्याने रेटारेटी झाली.
महिला लाभार्थी दीड-दोन तास उन्हात बसल्याने त्यातील एका महिलेला भोवळ आली तर अनेकांचा जीव कासावीस झाला होता.
कामगार कल्याण मंडळाच्या वतीने लाभार्थ्यांना संसारोपयोगी कीटचे वाटप केले जात आहे. गुरुवारी त्याचा प्रारंभ झाला आणि शुक्रवारपासून जिल्ह्यात चार ठिकाणी वाटप केंद्रे सुरू करण्यात आली होती. मुस्कान लॉन येथे वाटप यंत्रणेने विविध संघटनांच्या पाचशे लाभार्थ्यांना बोलावले होते. मात्र, प्रत्यक्षात पाच हजार लाभार्थी आल्याने गोंधळ उडाला.
तासभर उन्हात थांबल्यामुळे लाभार्थ्यांचा संयम सुटला आणि घुसाघुशी सुरू झाल्याने गोंधळ उडाला. उन्हामुळे त्यातील एका महिलेला भोवळ आल्याने गोंधळात आणखीनच भर पडली. शेवटी, वाटप प्रतिनिधींनी सगळ्यांना शांत करत पहिल्यांदा टोकन दिलेल्यांना पहिल्यांदा कीट दिले, त्यानंतर टोकन नसणाऱ्यांनाही वाटप केले. सायंकाळी उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.
गोंधळाला संघटनाच जबाबदार
संघटनांना ठरवून दिवस दिले असताना काहींनी आपल्या लाभार्थ्यांना पाठवून दिल्याने गोंधळ उडाला. वाटप करणाऱ्या यंत्रणेने संबधितांना विचारले असता संघटना प्रतिनिधी, एजंटांचा निरोप असल्याने आल्याचे सांगितले.
आम्ही पाचशे लाभार्थ्यांनाच बोलावले होते, पण एजंटांनी त्यांच्या लाभार्थ्यांना पाठवल्याने हा गोंधळ उडाला. वास्तविक ६ मार्चपर्यंत हे वाटप सुरू राहणार असताना अफवामुळे गर्दी झाली. तरीही दूरवरून आलेल्या सगळ्या लाभार्थ्यांना आम्ही वाटप केल्याशिवाय बंद करणार नाही. – शोएब शेख, वाटप प्रतिनिधी
आम्हाला आज वाटप असल्याचा निरोप मिळाल्याने आलो. सकाळपासून उन्हातान्हात बसलो आहे, लवकर वाटप केले तर घरी जाता येईल. – वैशाली सोळसे, लाभार्थी