अचानक दाखल झालेल्या टस्कर हत्तीने लहान कंग्राळीसह शहरातील शाहूनगर, वैभवनगर परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. गेल्या मे २०२३ नंतर महाराष्ट्रातील जंगलातून दुसऱ्यांदा कर्नाटक हद्दीत आलेल्या या टस्करने कोणाला इजा केली नसली, तरी वाहनांचे नुकसान केले.
वनविभागाने शुक्रवारी दुपारी हत्तीला जंगलात पिटाळले. महाराष्ट्राच्या हद्दीत दुपारी गेलेला हत्तीने पुन्हा सायंकाळी सीमेवरील बेक्कीनकेरेत येऊन धुमाकूळ घातला. वनखात्याने पुन्हा त्याला महाराष्ट्राच्या दिशेने हुसकावण्यात यश मिळविले.
याबाबतची माहिती अशी की, टस्कर हत्तीने सकाळी साडेपाचच्या सुमारास लहान कंग्राळीमध्ये प्रवेश केला. तेथून तो बॉक्साइट रोडमार्गे शाहूनगर आणि वैभवनगरच्या दिशेने गेला. हत्तीने तेथील रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान केले. एका कारची काच फोडण्याबरोबरच दोन-तीन दुचाकी त्याने सोंडेने भिरकावून टाकल्या. शाहूनगर येथे दुचाकीची सीट उचकटून फेकून दिली.
आक्रमक झालेल्या हत्तीमुळे घाबरलेल्या नागरिकांनी घरात कोंडून घेणे पसंद केले. काही उत्साही लोकांनी घरांच्या छतावरून मोबाइलवर हत्तीच्या कारनाम्याचे चित्रीकरणही केले. शाहूनगर व वैभवनगर येथून तो टस्कर शेतातून मोठ्या कंग्राळीच्या दिशेने गेला. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
टस्करच्या आगमनाची माहिती मिळताच, बेळगाव वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ विशेष मदत पथकांची निर्मिती करून घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्या हत्तीला शाहूनगर, वैभवनगर येथून सुरक्षितपणे हुसकावत मोठ्या कंग्राळीमार्गे पुन्हा लहान कंग्राळीकडे आणले.
हत्तीच्या मागे आणि पुढे वनखात्याची पथके कार्यरत होती. हत्तीसमोर सुरक्षित अंतर ठेवून मोटारसायकलवरून जाणारे वनाधिकारी सावधगिरीचा इशारा देताना दिसत होते. वनखात्याच्या पथकाने लहान कंग्राळी येथून त्या हत्तीला मोठ्या कौशल्याने अगसगे, बेक्कीनकेरीमार्गे दुपारी सव्वाबाराच्या सुमारास महाराष्ट्र हद्दीतील जंगलात हुसकावून लावले. यासाठी बेळगाव वनविभागाचे अधिकारी महाराष्ट्राच्या वनाधिकाऱ्यांची संधान साधून होते.
हत्तीला जंगलात हुसकावून लावल्यानंतर तो पुन्हा माघारी फिरू नये, यासाठी वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचारी बराच काळ जंगलाच्या सीमेवर तळ ठोकून होते.