गडहिंग्लज( जि.कोल्हापूर) : महायुतीचा ‘कोल्हापूर’चा उमेदवार अजून ठरलेला नाही.परंतु,नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपण कटिबद्ध राहुया.
खासदार संजय मंडलिक हेच शिंदे गटाचे उमेदवार असे डोळ्यासमोर ठेवून काम सुरू आहे.खासदार धनंजय महाडिक यांना पंतप्रधान मोदी यांच्या कल्याणकारी योजनांची आकडेवारी तोंडपाठ आहे.
त्यांनी आता ‘मोदींची गॅरंटी’ तेवढी पाठ करावी,असा सल्ला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.
गडहिंग्लज शहरातील ४७ कोटींच्या नळयोजनेसह ५५ कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ आणि बांधकाम कामगारांना भांडी संच वाटपप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी खासदार संजय मंडलिक होते.खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.नगरपालिकेच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला.
मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लजच्या विकास कामांसाठी १०० कोटींचा निधी दिला. रिंगरोड आणि बायपास रस्त्याशिवाय शहरातील वाहतुकीची कोंडी दूर होणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी माझाही चांगली ओळख आहे. त्यांच्याकडे जाताना महाडिक यांनी मलाहीसोबत न्यावे, म्हणजे संकेश्वर – आंबोली महामार्गाप्रमाणे रिंग रोडचे कामही नक्कीच मार्गी लागेल.
महाडिक म्हणाले, ७० वर्षात कॉंग्रेसने प्रत्येक निवडणुकीत रस्ते, वीज,पाणी देण्याची आणि गरीबी हटविण्याची केवळ आश्वासनेच दिली.परंतु, प्रत्यक्षात काहीच दिले नाही.लोकांच्या खऱ्या गरजा ओळखलेल्या मोदींनी ते अवघ्या १० वर्षात करून दाखवले.
मंडलिक म्हणाले,उपजिल्हयाचे ठिकाण म्हणून गडहिंग्लज शहराचा नियोजनबद्ध विकास करण्याची गरज आहे.निवडणूका येतील आणि जातील.परंतु, विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी पुन्हा आशीर्वाद द्यावा.
कार्यक्रमास प्रकाश चव्हाण, संग्राम कुपेकर, हेमंत कोलेकर,सतीश पाटील, वसंत यमगेकर, रमेश रिंगणे,नरेंद्र भद्रापूर, प्रकाश पताडे,अनुप पाटील,अमर मांगले,मंजुषा कदम,उर्मिला जोशी आदी उपस्थित होते. यावेळी किरण कदम, सिध्दार्थ बन्ने, महेश सलवादे यांचीही भाषणे झाली.गुंडया पाटील यांनी स्वागत केले.सुभाष कोरे यांनी सूत्रसंचालन केले. रश्मीराज देसाई यांनी आभार मानले.
‘रिंग रोड’साठी दिल्लीतून निधी आणू
पालकमंत्री मुश्रीफ यांनी गडहिंग्लजला शंभर कोटींचा निधी दिला,त्यातील ५५ कोटींच्या कामांचा प्रारंभ हा ऐतिहासिक दिवस आहे.झपाटयाने वाढत्या शहराच्या सर्वांगीण विकासाचा मास्टर प्लॅन तयार करावा.मी आणि संजयदादा दोघेही दिल्लीला जाऊन गडकरींचा शर्ट धरुन रिंग रोड साठी निधी आणून देवू, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली.