‘काही राजकीय घराणे कलम 370 चा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करायचे’, PM मोदींचा घणाघात

0
41

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. कलम 370 हटवल्यानंतर हा पीएम मोदींचा पहिलाच J&K दौरा आहे. गुरुवारी त्यांनी श्रीनगरमधील बक्षी स्टेडियममध्ये ‘विकसित भारत, विकसित जम्मू काश्मीर’ कार्यक्रमादरम्यान 6400 कोटी रुपयांच्या 53 विकास योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

यावेळी त्यांनी कलम 370 वरुन विरोधकांवर जोरदार टीकाही केली.

काही कुटुंबे 370 चा फायदा घ्यायचे…
पीएम मोदी म्हणाले, ‘काही राजकीय घराणे कलम 370 चा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करायचे. काँग्रेसने अनेक वर्षे देशाची दिशाभूल केली. काश्मिरींच्या प्रेमाचे ऋण फेडण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. येथील तरुणांच्या डोळ्यांत मला भविष्याची चमक दिसत आहे. राज्यातील लोक आता शांततेत जगत आहेत. या नव्या जम्मूच्या डोळ्यात एक नवी आशा आहे. आम्ही अनेक दशकांपासून या नव्या जम्मू-काश्मीरची वाट पाहत होतो.

काश्मीरमध्ये सर्वत्र कमळ
जम्मू-काश्मीरमध्ये आता काळ बदलला आहे. जम्मू-काश्मीर हा केवळ एक प्रदेश नसून भारताचे डोके आहे. विकसित काश्मीर ही विकसित भारताची प्राथमिकता आहे. यापूर्वी देशातील अनेक योजना काश्मीरपर्यंत पोहोचत नव्हत्या. आज जम्मू-काश्मीरला सर्व योजनांचा लाभ मिळतोय. मोदींनी दिलेल्या सर्व हमी पूर्ण होत आहेत. येथील तलावांमध्ये सर्वत्र कमळ पाहायला मिळते. 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या लोगोवरही कमळ आहे. हा योगायोग म्हणावा लागेल की, भाजपचे चिन्हही कमळ आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.

जम्मू-काश्मीरमध्ये G-20 चे शानदार आयोजन
पंतप्रधान पुढे म्हणाले की, पर्यटनासोबतच जम्मू-काश्मीरमध्ये कृषी आणि कृषी उत्पादनांचीही ताकद वाढतीये. जम्मू काश्मीरचे केशर, सफरचंद, ड्राय फ्रूट्स, चेरी…जम्मू काश्मीर हा स्वतःच एक मोठा ब्रँड आहे. जेव्हा हेतू चांगला असतो आणि संकल्प पूर्ण करण्याचा ध्यास असतो, तेव्हा परिणामही चांगले मिळतात. जम्मू-काश्मीरमध्ये G20 चे आयोजन कशा प्रकारे केले गेले, हे संपूर्ण जगाने पाहिले. आज जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनाचे सर्व विक्रम मोडले जात आहेत. 2023 मध्ये 2 कोटीहून अधिक पर्यटक येथे आले.

6400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे अनावरण
बक्षी स्टेडियममध्ये जाहीर सभेला संबोधित करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी 6400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे अनावरण केले. सुरक्षेच्या दृष्टीने पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी श्रीनगरमधील छोटे रस्तेही सील करण्यात आले. स्टेडियमबाहेर 24 तास अगोदर बॅरिकेडिंग करण्यात आले होते. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरमध्ये ड्रोन आणि क्वाडकॉप्टरच्या उड्डाणावरही बंदी घालण्यात आली. एवढा मोठा सार्वजनिक मेळावा अलीकडे काश्मीरमध्ये दिसला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here