पणजी : जुने गोवें येथील जगप्रसिद्ध सेंट फ्रान्सिस झेवियर पवित्र शव प्रदर्शन यावर्षी १ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर बासिलिका ऑफ बॉ जिझस चर्चसाठी पायाभूत सुविधांकरिता १७ कोटी रुपये खर्चाच्या कामाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी वर्चुअल पद्धतीने शुभारंभ झाला.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत निधीतून ही कामे केली जाणार आहेत. पवित्र शव प्रदर्शनाच्या आधी सर्व कामे पूर्ण केली जातील.
या चर्चचे वैशिष्ट्य म्हणजे युनेस्कोने जाहीर केलेले हे एक जागतिक वारसा स्थळ आहे.
सेंट फ्रान्सिस झेवियरचे ४00 वर्षांपूर्वीचे पार्थिव येथे जतन करुन ठेवले असून ते अद्याप जसेच्या तसे असल्याची भाविकांची भावना आहे. दर दहा वर्षानी हे पार्थिव भाविकांसाठी प्रदर्शनासाठी खुले केले जाते.
२0१४ साली पवित्र शव प्रदर्शन झाले होते. आता दहा वर्षांनी म्हणजेच या वर्षी २0२४ साली पुन: ते प्रदर्शनासाठी ठेवले जाईल. त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे.
सेंट झेवियरचे फेस्त दरवर्षी ३ डिसेंबर रोजी होते. शेजारी महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाविक या फेस्ताला येतात. कोल्हापूर, आजरा, गडहिंग्लज, नेसर्गी, मधवाल, देसनूर भागातून चालत यात्रेकरु ख्रिस्ती भाविक गोव्यात येतात. त्यांच्यासाठी मराठी, कन्नड तसेच विदेशी भाविकांसाठी स्पॅनिश व फ्रेंच भाषेतूनही प्रार्थनांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने पर्यटक या चर्चला भेट देतात.