कोल्हापूर : दोन हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून सुनिता कृष्णात पाटील (वय ४५, रा. कुरुकली, ता. करवीर) या अल्पशिक्षित महिलेने गावातील सुमारे ४०० महिलांच्या नावे विविध बँकांमधून कर्ज उचलले.
कर्जाचे हप्ते थकल्याने बँकांनी महिलांकडे तगादा लावल्याने हा प्रकार समोर आला. याबाबत महिलांनी शनिवारी (दि. ९) करवीर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. २०१९ मध्ये फसवणुकीचा प्रकार घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुरुकली येथील सुनिता पाटील या महिलेने कोरोना काळात गावातील काही महिलांचे गट स्थापन केले. प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून त्यांचे आधार कार्ड, बँकेचे पासबूक, रेशन कार्डच्या झेरॉक्स आणि फोटो घेतले. या कागदपत्रांच्या आधारे जिल्हा बँकेसह अन्य खासगी बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून प्रत्येक महिलेच्या नावावर ३० ते ५० हजार रुपये कर्जाची उचल केली. सुरुवातीचे काही महिने हप्ते भरले. यामुळे कागदपत्र देणा-या महिलांची संख्या वाढली. मात्र, कर्जाचे हप्ते थकल्यामुळे गेल्या वर्षभरापासून बँकांची वसुली पथके दारात येऊ लागल्याने महिलांचे धाबे दणाणले.
याबाबत महिलांनी स्मिता पाटील हिच्याकडे चौकशी करून कर्जाचे हप्ते भरण्याची विनंती केली. मात्र, तिने हात झटकल्यामुळे फसवणूक झालेल्या महिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. फसवणुकीची रक्कम एक कोटीपेक्षा जास्त असेल, असा अंदाज महिलांनी वर्तवला.
मास्टरमाईंड कोण?
फसवणूक करणा-या संशयित महिलेचे शिक्षण फक्त सातवीपर्यंत झाले आहे. महिलांचे कागदपत्र गोळा करणे आणि बँकांमधून कर्ज घेण्याच्या कामात तिला कोणीतरी मदत केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या प्रकरणामागील मास्टरमाईंड कोण? याची चर्चा परिसरात रंगली आहे