कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची संवर्धनासाठी पाहणी करण्यासाठी दिवाणी न्यायालयाने नियुक्त केलेले कोर्ट कमिशनर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे निवृत्त उपअधीक्षक विलास मांगीराज आणि निवृत्त मॉड्यूलर आर. एस.
त्र्यंबके गुरुवार, दि. १४ आणि १५ मार्च रोजी सकाळी ७ वाजता मंदिरात येणार आहेत, अशी माहिती दावा दाखल करणारे श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी दिली आहे.
अंबाबाईच्या मूर्तीचे तातडीने संवर्धन करावे, पुरातत्व विभागाच्या निवृत्त तज्ञांकडून मूर्तीचे संवर्धन करुन घेण्यास परवानगी मिळावी, यासाठी मुनीश्वर यांनी कोल्हापुरातील सहाव्या दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयात २०२२ मध्ये दावा दाखल केला आहे. या अनुषंगाने दिवाणी न्यायालयाने ४ एप्रिलपर्यंत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
मुनीश्वर यांनी याप्रकरणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, जिल्हा प्रशासन, राज्य पुरातत्व आणि केंद्रीय पुरातत्व विभाग तसेच प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलिप देसाई आणि ॲड. प्रसन्न मालेकर यांना प्रतिवादी केले आहे.