कोल्हापूर : विमानतळाच्या विकासासाठी ७० टक्के निधी हा केंद्र सरकारकडून दिला जातो. केंद्र आणि राज्याकडून भरघोस निधी विमानतळाच्या विकासासाठी दिला. त्या केलेल्या कामाचे चित्र जनतेसमोर आहे, त्यामुळे मी या कामाच्या श्रेयवादात पडणार नसल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितला.
काँग्रेसचे आमदार आणि माजी पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव व घेता खासदार महाडिक यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली.
ते (सतेज पाटील) सत्तेत असताना, महाडिक कधीही सत्तेत येणार नाहीत. त्यांचे विमान हवेत घिरट्या घालत आहे. बास्केट ब्रिज होणार नाही, असे जाहीर भाषणात सांगत होते. मी भाजपमुळे खासदार झालो.
घिरट्या घालणाऱ्या विमानाच्या कोल्हापूर विमानतळावरून ६ मार्गांवर विमानसेवा सुरू आहेत. बास्केट ब्रिजला मंजुरी मिळाली असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे.
दिवाळीत एकट्याचेच अभ्यंगस्नान : महाडिक
खासदार महाडिक म्हणाले, कामाचे श्रेय कोणी घ्यावे, ते ज्याचे त्यांनी पाहावे, दिवाळी झाली, थेट पाइपलाइनच्या पाण्यात जाऊन त्यांनी एकट्यांनीच अभ्यंगस्नान केले. त्यांना पाच ते सहा महिने संधी दिली, मात्र, थेट पाइपलाइनचे पाणी शहरवासीयांना मिळत नाही.
पाणी सर्वांना मिळण्यासाठी थेट पाइपलाइनच्या कामात लक्ष घालणार आहे. शहराच्या कोनाकोपऱ्यात अजूनही महिला घागरी, कळशा घेऊन आंदोलन करत आहेत. थेट पाइपलाइनमध्ये ज्या काही अडचणी आहेत, त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहील.
दरम्यान, लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात अजूनही कोणतीही ठोस सूचना प्रदेशाध्याकडून आलेली नाही. त्याबाबत कोणतेही शिक्कामोर्तब झालेले नाही.
‘वंदे भारत’ ट्रेन दोन दिवसांत
खा. महाडिक म्हणाले, अमृत महोत्सव योजनेंतर्गत ‘वंदे भारत’ ही कोल्हापूर ते मुंबई मार्गावर धावणारी ट्रेन येत्या दोन दिवसांत सुरू करण्यासाठी आपला आग्रह आहे.
त्यांची नाराजी वरिष्ठांना कळवू
लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांतील चर्चेबाबत नाराज असलेल्यांची नाराजी वरिष्ठांना कळविली जाईल. त्यांची नाराजी लवकरच दूर केली जाईल, असेही महाडिक यांनी सांगितले.