कोल्हापूर : ज्यावेळी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास निधीसह उमेदवारीचा शब्द दिला होता.
त्यामुळे मी बारावा खेळाडू नाही, मुख्यमंत्र्यांकडून मलाच उमेदवारीचा पहिला मान मिळेल. असा विश्वास खा. संजय मंडलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
कोल्हापूरमधून महायुतीकडून संजय मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत गेल्या तीन-चार दिवस उलटसुलट चर्चा सुरू असल्याने मंडलीक समर्थक कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था आहे.
या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या खासदारांची मंगळवारी मुंबईत बैठक पार पडली. त्यानंतर खा. मंडलिक यांनी मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवून भूमिका स्पष्ट केली. खा. मंडलिक म्हणाले, वृत्तपत्रातून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्याने उमेदवारीबाबत गेली रात्रंदिवस कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. निवडणूक म्हटले की, काही प्रमाणात खेचाखेची सुरू असणार, पण मला काळजी नाही.
मुख्यमंत्री शिंदे शब्दाचे पक्के
मुख्यमंत्री शिंदे हे शब्दाचे पक्के आहेत. ज्यावेळी त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याची भूमिका घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत ११ खासदार होते. त्यांना बाराव्या खासदाराची गरज असल्याने खा. श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने हे माझ्याकडे आले आणि त्यांनी सोबत येण्याचा आग्रह धरला. यावेळी, मी कशासाठी तुमच्यासोबत येऊ? असा प्रश्न केला. तुम्हाला अडीच वर्षांत निधी मिळालेला नाही, हवा तेवढा निधी देतो व पुढची उमेदवारीही तुम्हालाच देतो, असे आश्वासन खा. शिंदे यांनी दिले.
..म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली
त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत तर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाेबत मुंबईत बैठक झाल्यानंतर त्यांनीही उमेदवारीची ग्वाही दिली. मात्र, माध्यमातील चर्चेने कार्यकर्ते अस्वस्थ झाल्याने मंगळवारी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळीही त्यांनी इकडे कशाला आलाय प्रचाराला लागा, असे सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे, ॲड. सुरेश कुराडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश पाटील, माजी नगरसेवक सत्यजीत कदम आदी उपस्थित होते.
माझ्यासोबत भक्कम ताकद
पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडीक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आ. विनय कोरे यांच्याकडेच माझे प्रचाराचे नियोजन राहणार आहे. एवढी भक्कम ताकद माझ्यासोबत असल्याने काळजी नसल्याचे खा. मंडलिक यांनी सांगितले.
उमेदवारीबाबत साशंकता मग अधिवेशन कसे घेतले?
शिवसेनेचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापुरात घेतले. सर्वात सुरक्षित दोन्ही मतदारसंघ असल्यानेच येथेच अधिवेशन घेण्याचा त्यांचा आग्रह होता, असा गौप्यस्फोटही खा. मंडलिक यांनी केला.