फुलपाखरांचे आता हिंदी भाषेत नामकरण; ‘ब्ल्यू मॉरमॉन’ बनला ‘बडा बहुरुपिया’!

0
173
फुलपाखरांचे आता हिंदी भाषेत नामकरण; 'ब्ल्यू मॉरमॉन' बनला 'बडा बहुरुपिया'!

कोल्हापूर : स्थानिक भाषेत फुलपाखरांची नावे समजावीत, या हेतूने ‘राष्ट्रीय तितली नामकरण सभे’ने निसर्गात मुक्तपणे बागडणाऱ्या फुलपाखरांचे आता हिंदी भाषेत नामकरण केले आहे. आतंरराष्ट्रीय फुलपाखरु दिनानिमित्त पहिल्या टप्प्यात २२१ प्रजातींची नावे जाहीर झाली आहेत, ज्यात ‘अंगद’, ‘मल्लिका’, ‘जटायू’, ‘मोतीमाला’, ‘काग’, ‘बहुरुपिया’ अशा आकर्षक नावांचा समावेश आहे.

मराठीत ‘निलवंत’ म्हणून प्रसिध्द असलेले महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरु ‘ब्ल्यू मॉरमॉन’चे नामकरण आता हिंदीत ‘बडा बहुरुपिया’ असे केले आहे.

जैवविविधतेने संपन्न असलेल्या आपल्या देशात फुलपाखरांच्या १ हजार ४०० प्रजातींची नोंद आहे. यापूर्वी त्यांना इंग्रजी भाषेत नावे होती. सामान्य लोकांसाठी चार वर्षांपूर्वी राज्यात आढळणाऱ्या फुलपाखरांची मराठी भाषेतील नावे प्रसिद्ध झाली होती. फुलपाखरांच्या निरीक्षणामध्ये सहभागी असणाऱ्या देशातील विविध संस्थांनी या नामांतरणासाठी ‘राष्ट्रीय तितली नामकरम सभे’ची स्थापना केली आहे.

त्या माध्यमातून फुलपाखरु अभ्यासक दिवाकर ठोंबरे, आनंद पेंढारकर, डॉ. कृष्णमेघ कुंटे, धारा ठक्कर, मनीष कुमार, रुपक डे, रतींद्र पांडे, राहुल काला यांनी सहा महिने प्रयत्न करुन हे हिंदी नामकरण केले आहे. डॉ. कुंटे यांच्यासह त्यांच्या विद्यार्थी लोचना रविशंकर यांनीही मेहनत घेतली आहे. या नावांवर https://zenodo.org/records या संकेतस्थळावर १५ दिवसापर्यंत सुचना मागवण्यात आल्या आहेत. त्यांना लोकमान्यता मिळाल्यानंतरच ही यादी पुढील महिन्यात प्रकाशित करण्यात येउन नंतर ती सरकारसमोर सादर होणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here