
प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : महाविकास आघाडीमधील काही घटक पक्षांच्या नेत्यांचा शब्द घेऊन गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी गेल्या दोन अडीच वर्षापासून करत आहेत. दरम्यान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडी कडून काँग्रेस च्या वाट्याला गेला आहे. काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती याची उमेदवारी जाहीर होण्याची केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता चेतन नरकेही या निवडणुकाच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे . निवडणूक दौरे थाबवल्या नंतर आता डॉ. चेतन नरके हे पुन्हा एकदा आपल्या प्रचार दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. शुक्रवारपासून त्यांच्या करवीर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही पक्षाची वाट न पाहता तयारीला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा निवडणूक ही तिरंगी होण्याचे संकेत मिळत आहेत.गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी कोल्हापूर लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. महाविकास आघाडीमधून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी आतापर्यंत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबाबत चर्चा केली होती. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मातोश्रीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दोन वेळा चेतन नरके यांनी हजेरी लावली होती. आतापर्यंत त्यांनी लोकसभा मतदारसंघातील हजार पेक्षा जास्त गावांचा दोन वेळा दौरा केला आहे. त्याचबरोबर मतदारसंघात डिजीटल बोर्ड लावण्या पासून ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्या पर्यंत निवडणुकीची जय्यत तयारी सुरू ठेवली होती.महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा केला होता. मात्र या मतदारसंघात काँग्रेस आमदारांचे संख्याबळ जास्त असल्याने त्यावर काँग्रेसनेही दावा कायम केला होता. ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी डॉ. नरके यांनी विशेष प्रयत्न केले. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात चेतन नरके हे ठाकरे गटाच्या स्टेजवर होते. शिवाय खासदार अनिल देसाई, युवा सेनेचे वरुण सरदेसाई आणि संजय राऊत यांनी देखील नरके यांची घरी भेट घेतली होती. मात्र जागा वाटपात ही जागा काँग्रेसला गेली. काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते.जागा वाटपात कोल्हापूरची जागा काँग्रेसला गेली असली तरी गेल्या दोन वर्षांपासून चेतन नरके या मतदारसंघात तयारी करत आहेत. दोन वेळा हा मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर आपण ऐनवेळी माघार का घ्यावी? असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. एक सुसंस्कृत आणि अभ्यासू उमेदवार असल्याने शिक्षित तरुणाईत कमालीची क्रेझ आहे. अशातच नरके यांनी निवडणुकीला सामोरे जावे, असा दबाव कार्यकर्त्यांकडून ठाकला जात आहे. महाविकास आघाडी कडून उमेदवारी निश्चित नसली तरी अपक्ष लढण्याची तयारी डॉ. नरके यांची सुरु केली आहे. दरम्यान या अनुषंगाने शुक्रवार दि २२ मार्च पासून ते दौऱ्याला सुरुवात करणार असल्याची माहिती मिळत आहे.

