साखर उत्पादनात कोल्हापूर विभाग आघाडीवर, यंदाच्या गळीत हंगामात साखर उताऱ्याच्या टक्केवारीत वाढ

0
178

.
प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापुर : राज्यातील चालू वर्षीच्या ऊस गळीत हंगामात आज अखेर एकूण १० कोटी २८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी मिळून आतापर्यंत एकूण १० कोटी १२ लाख टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. दरम्यान, यंदाच्या गळीत हंगामात सरासरी साखर उताऱ्याच्या टक्केवारीत ०.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात आज अखेरपर्यंतच्या साखर उताऱ्याची टक्केवारी ९.९६ टक्के इतकी होती. यंदाच्या गळीत हंगामातील आजअखेरपर्यंतचा साखर उतारा हा १०.१६ टक्के इतका आहे. यानुसार साखर उताऱ्यात ०.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे.साखर उतारा वाढल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किमान हमीभावाची रक्कम अधिकची मिळू शकणार आहे. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत आजअखेरपर्यंत गळीत पूर्ण झालेल्या उसाच्या तुलनेत यंदा २५.७२ लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत एकूण १०३८.४१ लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले होते.

साखर उत्पादनही सहा लाख सात हजार क्विंटलने कमी झाले आहे. गेल्या २०२३ च्या हंगामात आजअखेरपर्यंत १०३४.५२ लाख क्विंटल इतके साखर उत्पादन झाले होते.

राज्यात यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत एकूण २०७ साखर कारखान्यांनी उसाचे गाळप सुरू केले आहे. यामध्ये १०३ सहकारी आणि १०४ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. राज्याच्या साखर आयुक्तालयाच्यावतीने मंगळवार दि १९ मार्च रोजी यंदाच्या ऊस गळीत हंगामाची सद्यःस्थिती दर्शविणारा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

कोल्हापूर विभागाची आघाडी
साखर उत्पादनात राज्यात कोल्हापूर विभागाने आघाडी घेतली असून या विभागातील आतापर्यंतचे साखर उत्पादन हे सर्वाधिक २६६.८४ लाख क्विंटल इतके झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here