
प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : एप्रिलमध्येच जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून पाणीटंचाईने डोके वर काढले असून, गावपातळीवर पिण्याच्या पाण्याबाबत जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासन ‘अलर्ट’ झाले असून एकूण चार खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यामध्ये तीन हातकणंगले तालुक्यातील आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून याबाबत रोज अद्ययावत माहिती घेतली जात असून त्यानुसार महसूल विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात येत आहेत. कोल्हापूर जिल्हा प्रभारी ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी वैजनाथ कराड यांनी ही माहिती दिली. गतवर्षी कमी झालेले पावसाचे प्रमाण यामुळे भूगर्भातील पाण्याचा साठा कमी झाला असुन त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे. जट्टेवाडी ता. चंदगड, माले, मालेवाडी, अंबपवाडी, मजले ता. हातकणंगले या ठिकाणीही या विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. नावली ता. पन्हाळा, कोलिक ता चंदगड, जकीनपेठ, जागेवाडी ता. भुदरगड या ठिकाणीही पाणी टंचाई निर्माण झाली असून या ठिकाणी नवीन विंधण विहिरी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

